होय, शरद पवारांनी आपल्याला उमेदवारीबाबत विचारणा केली आहे

राष्ट्रवादीप्रमाणेच भारतीय जनता पक्षाकडूनदेखील आपणास उमेदवारीबाबत विचारणा झाली आहे.
Yes, Sharad Pawar had asked me about candidature: Abhijit Patil
Yes, Sharad Pawar had asked me about candidature: Abhijit Patil

मंगळवेढा : "पंढरपूर मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांकडून आपल्याला उमेदवारीबाबत विचारणा झाली आहे. मात्र, या मतदारसंघातील उमेदवार हा मतदारांच्या सर्वेक्षणातून ठरणार आहे,'' असे डी. व्ही. पी. उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर मतदार संघातील रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. त्या अनुषंगाने मतदार संघात सर्वच पक्षांकडून उमेदवाराबाबत अनेक नावे चर्चेत येत असतानाच त्यामध्ये डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे देखील नाव या चर्चेत आले. निवडणूक लढविण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली. 

अभिजित पाटील म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी साखर कारखानदारीतील अडचणीसंदर्भात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या निवडणुकीसाठी उभारणार काय? अशी मला विचारणा केली. त्यावर आपण होकार दिला आहे; परंतु त्यासाठी त्यांनी पक्षाकडून सर्वच इच्छुकांकडून याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणात पसंती मिळालेल्या इच्छुकांमधूनच उमेदवार निश्‍चित केला जाणार आहे, असे सांगितले. 

राष्ट्रवादीप्रमाणेच भारतीय जनता पक्षाकडूनदेखील आपणास उमेदवारीबाबत विचारणा झाली आहे. त्यांच्याकडूनदेखील सर्वेक्षण केले जात आहे. त्यातूनच ज्या उमेदवाराला अधिक पसंती मिळेल, त्याचे नाव निवडणुकीसाठी अंतिम होणार आहे, असे पाटील यांनी नमूद केले. 

ते म्हणाले की या मतदारसंघातील नागरिकांना पिढ्यानपिढ्या रोजगाराच्या प्रश्‍नावर संघर्ष करावा लागतो आहे. ज्या उमेदवाराकडे विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा लोकांना आवडला तर लोक स्वीकारतील. आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाचा अजेंडा होता, तो त्यांनी लोकांसमोर मांडला. लोकांनी त्यांना स्वीकारत विधानसभेत पाठवले. पंढरपूर मतदारसंघात सध्या विकास, तीर्थक्षेत्र व पर्यटनांचा विकास होणे प्रलंबित आहे. त्याचबरोबरच या दोन्ही तालुक्‍यांचे अर्थकारण हे साखर कारखानदारीवर अवलंबून आहे. परंतु साखर कारखानदारीचे अर्थकारण कोलमडल्यामुळे या मतदारसंघात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असा दावाही पाटील यांनी या वेळी बोलताना केला. 

मंगळवेढासारख्या ठिकाणी एमआयडीसी असून मोठे उद्योग आले नाहीत. पंढरपूरसारख्या ठिकाणी एमआयडीसी नाही. रोजगार निर्मितीसाठी राजकारणात यावं, अशी माझी इच्छा आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात विमानतळ झाल्यास या भागातील अनेकांना हे सोयीचे ठरणार आहे. महामार्गामुळेही नवीन रोजगार निर्माण होणार असले तरी त्याचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे.

नवीन पर्याय घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहे. आपले विकासाचे राजकारण करण्याचे ध्येय असून तीच भूमिका आपण लोकांसमोर मांडणार आहोत. लोकांना आवडलं तर ते आपल्याला स्वीकारतील; अन्यथा स्वीकारणार नाहीत. सध्या पंढरपूर परिसरातील वातावरण गढूळ होण्यास राजकारणदेखील कारणीभूत ठरल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यात बदल घडविण्यासाठी राजकारणात येण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com