पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या काळेंवर शेतकरीहिताची जबाबदारी

वयाच्या 26 व्या वर्षी काळे जिल्हा परिषद सदस्य झाले.
Vasudev Kale Appointment as State President of Bharatiya Janata Party Kisan Morcha
Vasudev Kale Appointment as State President of Bharatiya Janata Party Kisan Morcha

केडगाव (जि. पुणे ) : शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि कृषी क्षेत्राशी आपली नाळ कायम ठेवून काम करणारे वासुदेव काळे यांच्याकडे त्यांच्या आवडीच्याच क्षेत्राची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने सोपवली आहे. माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे असलेली किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ काळे यांच्या गळ्यात घातली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी कायम लढाऊ बाणा दाखवला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना कांदा निर्यातबंदीचा निर्णय झाला होता, त्या निर्णयाच्या निषेधार्थ त्यांनी पवारांना काळे झेंडे दाखवले होते. शेतकरीहितासाठी काळे यांना पक्षाने व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. (Vasudev Kale Appointment as State President of Bharatiya Janata Party Kisan Morcha)

मेकॅनिकल इंजिनिअर असलेले काळे हे दौंड तालुक्यातील शिरापूरचे रहिवासी आहेत. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, धडाडीचे नेतृत्व, महाविद्यालयीन शिक्षणानंतर राजकारणात आलेले वासुदेव काळे सुरुवातीपासूनच भाजपात कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यात भाजपची दयनीय अवस्था असताना काळे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात १९९७ मध्ये विजय मिळवला होता. वयाच्या 26 व्या वर्षी काळे जिल्हा परिषद सदस्य झाले, तर वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. वासुदेव काळे यांच्या पत्नी माधुरी काळे यांनीही २००२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला होता.

भीमा-पाटस साखर कारखान्याच्या 1997 मधील निवडणुकीत आमदार सुभाष कुल व रमेश थोरात यांच्या विरोधात आमदार प्रकाश देवळे व वासुदेव काळे यांनी जोरदार लढत दिली होती. ही निवडणूक राज्यभर गाजली होती.

आमदार सुभाष कुल यांच्या निधनानंतर झालेल्या भीमा-पाटस साखर कारखान्याच्या निवडणुकीत (2002) राहुल कुल यांच्या बरोबर वासुदेव काळे यांनी युती करून प्रचंड मताधिक्याने पॅनेल निवडून आणला होता. दौंड विधानसभा निवडणुकीत काळे यांनी आमदार सुभाष कुल, आमदार रंजना कुल, आमदार रमेश थोरात, आमदार राहुल कुल यांच्या विरोधात निवडणुका लढविल्या आहेत. विधानसभेच्या 2014 मधील निवडणुकीत वासुदेव काळे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची चिन्हे असताना भाजप व रासपची युती झाली आणि ही जागा रासपला गेली. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत काळे यांना थांबावे लागले. तसेच, 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वासुदेव काळे इच्छुक असताना राजकीय घडामोडींमुळे त्यांना पुन्हा थांबावे लागले.

बारामती लोकसभा निवडणुकीचे सलग चार निवडणुकांचे प्रमुख म्हणून त्यांनी प्रभावीपणे जबाबदारी पार पाडलेली आहे. काळे यांनी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष, भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष, महाराष्ट्र किसान मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस या पदांवर काम केले आहे. काळे यांनी गेल्या आठ वर्षापासून जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचविला आहे. यात मोफत माती परीक्षण, नवीन पीक पद्धती, नवनवीन विकसित कृषी तंत्रज्ञान, शेती पूरक व्यवसाय, पशुसंवर्धन अशा अनेक विषयांवर प्रभावीपणे काम केले आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला कृषीमित्र पुरस्कार काळे यांना मिळालेला आहे.

पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प व धरणग्रस्त संघटनेच्या माध्यमातून उजनी धरण व विविध जल प्रकल्पांमधील विस्थापित व लाभधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. विरोधी पक्षात काम करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी अतिशय आक्रमक आंदोलने, उपोषण करणारा हा कार्यकर्ता आहे.
 
खडकवासला धरण प्रकल्पातील पाण्याबाबत ग्रामीण व शहरी भाग असा संघर्ष निर्माण झाल्यानंतर काळे यांनी 'खडकवासल्याचे पाणी पाकिस्तानला जात नाही' असे सरकारला व प्रशासनाला ठणकावून सांगितले होते. खडकवासल्याच्या पाण्यावर विस्थापित व लाभधारक शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे, अशी भूमिका काळे नेहमी घेत आले आहेत. राज्यात व पुणे जिल्ह्यामध्ये भाजपची दयनीय अवस्था असतानाही पुणे जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या वासुदेव काळे यांना पक्षाने प्रदेश स्तरावरील पद देऊन त्यांच्या कामाला न्याय दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com