राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप टिकवणाऱ्या वासुदेव काळेंना मिळाले निष्ठेचे फळ  - Vasudev Kale Appointment as State President of Bharatiya Janata Party Kisan Morcha | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप टिकवणाऱ्या वासुदेव काळेंना मिळाले निष्ठेचे फळ 

सावता नवले
मंगळवार, 1 जून 2021

काळे यांनी पुणे जिल्हा परिषदेत पडत्या काळात पक्षाची खिंड लढवली होती.

कुरकुंभ (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष जिवंत ठेवून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणारे दौंड तालुक्यातील वासुदेव शंकरराव काळे यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. सत्ताधाऱ्यांशी कायम संघर्ष करणारे काळे यांच्या खांद्यावर भारतीय जनता पक्षाने किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी त्यांनी किसान मोर्चाचे उपाध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या जागी ही निवड झालेली आहे. (Vasudev Kale Appointment as State President of Bharatiya Janata Party Kisan Morcha)

भारतीय जनता पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वासुदेव काळे यांना किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले आहे. या प्रसंगी पुणे जिल्हा भाजपचे संघटन सरचिटणीस धर्मेद्र खांडरे, पक्षाचे ग्रामविकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश आखाडे, सनी सोनार, मनोज फडतरे, विकास काळे, रवींद्र दोरगे, नवनाथ साळुंके, प्रवीण काळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा  ः राष्ट्रवादीचे रविराज तावरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा : हल्लेखोर चौघांना अटक 

शेतकरी कुटुंबात जन्मलेले वासुदेव काळे यांनी आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवातच पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून केली होती. दौंड तालुक्यातील भीमा-पाटस साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुल गटाच्या पॅनेलमधून काळे आणि नामदेवराव ताकवणे ह्या भाजपच्या दोघांनी विजय मिळविला होता. काळे व त्यांच्या पत्नी माधुरी काळे यांनी पुणे जिल्हा परिषदेत पडत्या काळात पक्षाची खिंड लढवली होती.

वासुदेव काळे यांनी भाजपकडून दौंड विधानसभेची निवडणूक तीन वेळा लढविली होती. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघाचे प्रचारप्रमुख म्हणूनही त्यांनी तीन वेळा जबाबदारी सांभाळली आहे. पक्षीय पातळीवर त्यांनी जोमाने काम केले आहे. अगदी संघर्षाच्या काळात त्यांनी भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यानंतर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा या तीन राज्यांसाठी दोन सदस्यांचे नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये वासुदेव काळे यांचा समावेश आहे. तसेच, मध्य रेल्वेच्या विभागीय समितीचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प व धरणग्रस्त संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहात आहेत. 
                
शेतकरीहितासाठी रस्त्यावर उतरणार : काळे 

भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर विश्वास ठेवून किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. पक्ष संघटन व सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरविला जाईल. शेतकरी हितासाठी राज्यात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जातील अशी प्रतिक्रिया निवडीनंतर काळे यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख