मोहिते-पाटील विरोधक जानकरांना पवारांचे बळ; लग्न समारंभास लावली हजेरी 

मात्र पवार-अकलूज हे समीकरण तुटले.
Sharad Pawar presence at wedding Of Uttam Jankar's son's
Sharad Pawar presence at wedding Of Uttam Jankar's son's

सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवारांचा माळशिरस तालुक्याचा दौरा म्हटलं की अकलूजला त्यांचे थांबणे नक्की असायचे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुढे माजी उपमुख्यमंत्री विजयदादांसह संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय भाजपवासी झाले. त्यानंतर मात्र पवार-अकलूज हे समीकरण तुटले. मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांना विधानसभेला तिकिट देण्यापासून ते जिल्हा नियोजन समितीवर त्यांची निवड करत पवारांनी त्यांना बळ देण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. शस्त्रक्रियेनंतर आज प्रथमच सोलापूर जिल्ह्यात येत जानकरांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावत पवारांनी त्याचा प्रत्यय पुन्हा आणून दिला. (Sharad Pawar presence at wedding Of Uttam Jankar's son's )     

शरद पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे अतूट नाते आहे. प्रसंग सुखद असो वा दुःखद पवार सोलापूर जिल्ह्यासाठी नेहमी धावून येतात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन व डॉ. स्नेहल यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पवार आज अचानक वेळापुरात (ता. माळशिरस, जि. सोलापूर) दाखल झाले. जानकरांच्या घरी लावून पवारांनी आज सर्वांना सुखद धक्का दिला. 

माळशिरस तालुका म्हटले की एकेकाळी शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जायचे. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयदादांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील ह्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मोहिते पाटलांनी माढ्याची निवडणूक प्रतिष्ठेची करत भाजपचा प्रचार केला.

मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडणे पवार यांच्यासाठी धक्का मानला जात होता. मोहिते पाटील पक्ष सोडून गेले तरी पवार डगमगले नाहीत. त्यांनी माढ्यातून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना लोकसभेला उतरविले. प्रतिष्ठेच्या त्या निवडणुकीवेळी ‘तुम्ही संजय शिंदेंना खासदार करा, माळशिरस तालुक्‍याचा आमदार म्हणून मी तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल, तुमची विकास कामे मार्गी लावेन,’ असा शब्द पवार यांनी माळशिरसच्या जनतेला दिला होता. पण, त्या निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला. 

विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी लावण्यात आली. पण, अल्पमताने जानकरांचा पराभव झाला. त्यानंतरही पवारांनी जानकरांना बळ देण्याचे धोरण कायम ठेवले. मध्यंतरी झालेल्या दौऱ्यातही पवारांनी जानकरांच्या घरी भेट दिली होती. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर त्यांची निवड करत त्यांना राजकीयदृष्ट्या ताकदवान बनविण्याचे काम पक्षाकडून सुरू आहे. 

नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पवारांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला, तो उत्तम जानकर यांच्या चिरंजीवांच्या लग्नाला हेजरी लावण्यासाठीच. निवडणुकीच्या धामधुमीत पवारांनी दिलेला तो शब्द पाळत जानकरांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली आहे. 

भरणेमामांचे टायमिंग चुकले

या सोहळ्यासाठी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे उपस्थित होते. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले; परंतु शरद पवार व भरणे यांची शेवटच्या क्षणी भेट झाली. विवाह सोहळा आटोपून जाण्यासाठी पवार निघाले असता पालकमंत्री भरणे यांचे त्याठिकाणी आगमन झाले. आजच्या सोलापूर दौऱ्यात पालकमंत्री भरणे यांचे टायमिंग हुकल्याचे समोर आले. 
 
विद्यमान पदाधिकारी आणि इच्छुक लग्नसोहळ्यानिमित्त आले एकत्र

वेळापूरमध्ये जानकर यांच्या घरी आल्यानंतर पवार यांनी आमदार संजय शिंदे यांच्याकडून जिल्ह्यातील साखर कारखानदारी, उपलब्ध उसाचे क्षेत्र याबाबतची माहिती घेतली. जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या बैठकांची माहिती घेतली. कोरोना कालावधीत जिल्हा परिषदेच्या बैठका झाल्या का? याबाबतची माहिती शरद पवार यांनी आवर्जून घेतली.

सोलापूरच्या राष्ट्रवादीत काही महत्त्वाचे बदल करण्याच्या सूचना पक्षाध्यक्ष पवार यांनी यापूर्वीच पालकमंत्री भरणे यांना दिल्या आहेत. सध्या असलेले पदाधिकारी व इच्छुक पदाधिकारी आज विवाह सोहळ्यानिमित्त पवारांच्या उपस्थितीत एकत्रित आले होते. त्या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्यात काही घडामोडी घडल्या का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com