आमदार आवताडेंच्या कारखान्याने परस्पर विकली ९० हजार क्विंटल साखर

प्रचलित टेंडर पद्धत डावलून आपल्या मर्जीतील व्यापाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने साखरविक्री केली.
Serious objections in the audit regarding the management of Damaji Sugar Factory of Avtade
Serious objections in the audit regarding the management of Damaji Sugar Factory of Avtade

सोलापूर  ः भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे अध्यक्ष असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबाबत सहकारी संस्थेच्या वर्ग एकचे विशेष लेखापरीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी लेखापरीक्षणात अतिशय गंभीर दोष नोंदवले आहेत. (Serious objections in the audit regarding the management of Damaji Sugar Factory of Samadhan Avtade)

दामाजी कारखान्याने 90 हजार 670 क्विंटल साखर राज्य सहकारी बँकेस न कळवता परस्पर विक्री केली आहे. या साखर विक्रीतून आलेल्या 28 कोटी 13 लाख चार हजार 780 रुपयांची विल्हेवाट लावण्यात आल्याचे म्हटले आहे. याबाबतचा अहवाल त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांना सादर केला आहे. या साखर विक्रीची रक्कम माल तारण खात्यात न भरल्याने  कारखान्याला व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

दामाजी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत अशोक कृष्णा जाधव व इतर 21 जणांनी 17 ऑगस्ट 2020 रोजी पत्र लिहून आक्षेप नोंदवले होते. त्यामध्ये लेखापरीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी केलेल्या तपासणीत आक्षेप आढळले आहेत. कारखान्याने 2017-18 व 2018-19 मध्ये उत्पादित झालेली साखर राज्य सहकारी बँकेकडे माल तारण कर्जापोटी दिली आहे.

तक्रारदाराने कारखान्याची 75 हजार क्विंटल साखर कमी असल्याचे अर्जात म्हटले होते. मात्र, लेखा परीक्षणाच्या तपासणीत 90 हजार 670 क्विंटल साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेस न कळवता परस्पर विक्री केल्याचे आढळून आले आहे. या साखर विक्रीतून आलेल्या 28 कोटी 13 लाख चार हजार 780 रुपयांची रक्कम बँकेच्या कर्ज खात्यामध्ये जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. यात बँकेचे तपास अधिकारीदेखील सामील आहेत, असे अहवालात म्हटले आहे. 

सुमारे ९० हजार क्विंटल साखर विक्रीची रक्कम माल तारण खात्यात न भरल्याने संत दामाजी कारखान्याला नाहक व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या आर्थिक नुकसानीस तत्कालीन कार्यकारी संचालक व  संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. याच गाळप हंगामात कारखान्याने जाणीवपूर्वक साखर विक्रीची प्रचलित टेंडर पद्धत डावलून आपल्या मर्जीतील व्यापाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने साखर विक्री केली, त्यामुळे कारखान्याला स्पर्धात्मक दराचा फायदा झाला नाही. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान झाले. 

दामाजी कारखान्यावर साधारणत 200 कोटींचे कर्ज आहे. गेल्या सात महिन्यांपासून कारखान्यातील कामगारांचे 6 कोटी 70 लाख 61 हजार 799 रूपये पगार थकलेला आहे. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) 2 कोटी 73 लाख 84 हजार 160 रकमेचा भरणा केला नाही. कारखान्यांमधील 38 कर्मचारी मयत झाले असून त्यांची 31 लाख 52 हजार 533 इतकी रक्कम अद्याप देणे बाकी आहे. ही रक्कम थकीत राहण्याच्या कारणांचा खुलासा करण्याची मागणी करून तो करण्यात आलेला नाही. 

साखरविक्रीची रक्कम ऊसबिल देण्यासाठी वापरली : कार्यकारी संचालक

दामाजी कारखान्याने २०१७-१८ व २०१८-१९ मधील उत्पादीत साखरेपैकी ९० हजार ६७० क्विंटल साखर विक्री केली. या रकमेचा विनियोग गाळप हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची रक्कम देण्यासाठी केला. हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मधील ऊस तोडणी, वाहतूक ठेकेदार यांचे पूर्ण तोडणी वाहतूक बिले, कामगारांचे पगार, पीएफ, जीएसटी रक्कम, मशिनरी दुरुस्ती व निगा तसेच शासकीय देणी दिली आहेत. ही साखर विकून आलेल्या रकमेपैकी जास्तीची रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अल्पमुदत कर्ज व मालतारण कर्जापोटी भरणा केलेली आहे. कारखान्याने आजमितीस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मालतारणावर घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासह पूर्णपणे परतफेड केलेली आहे, अशी माहिती दामाजी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com