प्रणिती शिंदेंनी आपल्या खबऱ्यांचा पगार वाढवावा; कारण... - Praniti Shinde should increase the salary of her informants : Farooq Shabdi | Politics Marathi News - Sarkarnama

प्रणिती शिंदेंनी आपल्या खबऱ्यांचा पगार वाढवावा; कारण...

प्रमोद बोडके
सोमवार, 5 जुलै 2021

प्रणिती शिंदे यांनी राजकारण जरुर करावे.

सोलापूर : कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या खबऱ्यांचा पगार वाढवावा. कारण, हे खबरी आपणास चुकीची माहिती देत आहेत. प्रणिती शिंदे यांनी राजकारण जरुर करावे. मात्र, खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करू नये. मुस्लिम बांधवांना कुराणची शपथ देऊन त्यांना जलील करू नका. आम्हाला आता बी टीम म्हटल्याचा फरक पडत नाही. आम्ही जनतेचे काम करून निवडून येऊ, असा विश्वास ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी व्यक्त केला. (Praniti Shinde should increase the salary of her informants : Farooq Shabdi)

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी परवा एका कार्यक्रमात एमआयएमला मत म्हणजे भाजपला मत असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, शहर मध्यमधून 2019 ची विधानसभा निवडणूक मी लढविली. माझ्या विरोधात कॉंग्रेसने प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांना आणले होते. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मग मला सांगा भाजपची बी टीम कोण आहे? असा प्रश्‍नही शाब्दी यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा : निलंबित आमदार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकणार का?

कॉंग्रेसचे नेते काम तर करतच नाहीत; उलट एमआयएम पक्षाला का दोष देता? आम्हाला बी टीम म्हणायचे सोडून द्या. जनतेला सर्व कळाले आहे की तुम्हीच भाजपची बी टीम आहात. कॉंग्रेस पक्षामधील निवडून आलेले आमदार, खासदार, मंत्री, भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपचे मिशन लोटसही पूर्ण होत आहे. कॉंग्रेसने आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे, तुमच्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर का फोडता, कॉंग्रेसच भाजपची ए टू झेड टीम असल्याचा टोलाही त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना लगावला.   

गरिबांसाठी काम करत राहणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाने 20 हजार कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले. अनेक दवाखान्यांना पीपीई कीट व नागरिकांना मास्क वाटप केले. एमआयएमने जेवढे काम केले, तेवढे काम कोणत्याच नेत्यांनी, पक्षांनी केले नाही. यापुढे ही गरिबांसाठी काम करणार असल्याचेही एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख