निलंबित आमदार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकणार का? - can suspended MLAs vote in Assembly speaker election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

निलंबित आमदार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकणार का?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

आमदारांचे वेतन, भत्ते सुरू राहणार.. 

मुंबई : विधानसभेतील गोंधळाच्या नाट्यानंतर भाजपचे बारा आमदार निलंबित झाले आहेत. त्यामुळे भाजपचे विधानसभेतील संख्याबळ बाराने घटले आहे. हे आमदार निलंबित झाल्यानंतर त्यांना इतर आमदारांप्रमाणे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. महाविकास आघाडीने ठराव करताना या आमदारांना विधानभवनाच्या आवारातही फिरकू न देण्याची अट घातली आहे. पुढील एक वर्षासाठी हे आमदार मुंबई किंवा नागपूर येथील विधानभवनाच्या आवारात त्यामुळे येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (12 BJP MLAs suspended in assembly) 

विधानसभेत एखाद्या महत्वाच्या मुद्यावर मतदानाची वेळ आली तर हे निलंबित आमदार मतदान करू शकतील का, अशी शंका आता अनेकांना आली आहे. भाजपचे संख्याबळ कमी झाल्याने महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेईल, असा अंदाज अनेकांचा होता. अद्याप त्या पातळीवर काही हालचाली नाहीत. पण  निवडणूक झालीच तर हे आमदार मतदान करू शकतील का, हा प्रश्न चर्चेत राहिला.

याबाबत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले की निलंबित आमदार विधानसभेच्या सभागृहातही येऊ शकत नाहीत. तेथील कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत. चर्चा नाही आणि मतदानही करू शकत नाही. ते विधानभवनाच्या आवारात मात्र येऊ शकतात. विरोधी पक्षनेत्याच्या दालनापर्य़ंत येण्याची मुभा त्यांना राहील. त्यामुळे त्यांनी मतदान करण्याचा प्रश्नच नाही.

या आमदारांचे मानधन, सभागृहाबाहेरील बैठका, त्यांचा स्थानिक विकास निधी सुरू राहतील का, या प्रश्नावर गुजराथी म्हणाले की माझ्या माहितीनुसार त्यात कोणता अडथळा येऊ नये. तरीपण याबाबत नक्की काय ठराव झाला, हे पाहायला हवे. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत निलंबित झालेल्या आमदारांच्या इतर सुविधा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतरच्या विधानसभा अध्यक्षांनी यात काही बदल केला आहे का, याची मला कल्पना नाही. इतर विधानसभा अध्यक्षांनी यावर अलीकडच्या काळात जो काही निर्णय दिला आहे तो या आमदारांबाबत लागू राहील. 

अनेक निलंबित आमदारांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केल्याची उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत. हे कसे काय, या प्रश्नावर विधीमंडळाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले की  सभागृहातील नियमांचे उल्लंघन  आणि गैरवर्तन याबद्दल त्यांना निलंबित केले आहे. राज्यसभेची निवडणूक ही पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह (लोकप्रतिनिधी) कायद्याखाली असल्याने त्यांचा मतदानाचा अधिकार तेथे अबाधित राहतो.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार का?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हीप लागू होत नाही. तसेच मतदानही गोपनीय पद्धतीने होते. त्यामुळे ही निवडणूक घेताना महाविकास आघाडीच्या मनात धाकधूक होती. अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका ठरविताना ही निवडणूक घेण्याचे नियोजन नव्हते. मात्र आता विधानसभेतील भाजपचे बळ हे 106 वरून बाराने कमी झाली आहे. या निलंबनानंतर भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे  साहजिकच महाविकास आघाडीसाठी ही परिस्थिती अनुकूल असल्याचे मानले जात आहे.

वाचा या बातम्या : आमदार सरनाईक विधानसभेत अवतरले आणि म्हणाले

सरकार जागे होण्यासाठी आणखी किती स्वप्नील हवेत?

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस व जाधव यांच्यात चकमक

भास्कर जाधवांना शिवीगाळ; भाजपचे बारा आमदार निलंबित

गिरीश महाजन डायसवर, संजय कुटेंनी माईक खेचला

ओबीसींच्या मुद्यांवरून गाजली विधान परिषद

निलंबित आमदारांची नावे

संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपुते, हरिश पिंगळे, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, नारायण कुचे, बंटी भांगडिया आणि योगेश सागर. हे आमदार एक वर्षासाठी निलंबित झाले आहेत.

विधानसभेतील पक्षनिहाय आमदारांची संख्या 

 • शिवसेना- 56
 • राष्ट्रवादी काॅंग्रेस- 53
 • काॅंग्रेस- 43
 • भाजप-106
 • बहुजन विकास आघाडी-3
 • समाजवादी पक्ष-2
 • एमआयएम-2
 • प्रहार जनशक्ती-2
 • मनसे-1
 • सीपीएम-1
 • शेकाप-1
 • स्वाभिमानी -1
 • रासप-1
 • जनसुराज्य-1
 • क्रांतिकारी शेतकरी पक्ष-1
 • अपक्ष-13
 • रिक्त 1
 • (विधीमंडळाच्या वेबसाईटवरून)
 • महाविकास आघाडी सरकारने आपला विश्वासदर्शक ठराव हा 172 मते मिळवून मंजूर करून घेतला होता. त्यामुळे `मॅजिक फिगर`145 पेक्षा अधिक मते महाविकास आघाडीकडे सध्या तरी आहेत. काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मिळूनच संख्या ही 152 होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बहुमताबाबत निश्चिंत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख