दौरा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा; चर्चा शिवसेनेच्या दिलीप मानेंची!

माजी आमदार माने कोणत्याही पक्षात असोत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचे वैयक्तिक संबंध त्यांनी चांगल्या पद्धतीने जपले आहेत.
Jayant Patil and Dhananjay Munde met to Dilip Mane of Shiv Sena
Jayant Patil and Dhananjay Munde met to Dilip Mane of Shiv Sena

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरु केलेल्या परिवार संवादच्या दुसऱ्या पर्वाला आज (ता. २४ जून) तुळजापुरातून सुरुवात झाली. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी (ता. २३ जून) रात्री सोलापुरात मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी या दोन्ही नेत्यांनी सोलापूरच्या सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील व मंत्री मुंडे यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. माने यांचा पाहुणचार घेऊन हे दोन्ही नेते तुळजापूरला रवाना झाले. सोलापुरात माजी आमदार माने, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विधान परिषद निवडणूक या राजकीय चर्चांना अधिक वेग आला. त्यामुळे आजचा दौरा जरी जयंत पाटील यांचा असला तरीही चर्चा मात्र दिलीप माने यांचीच आहे. (Jayant Patil and Dhananjay Munde met to Dilip Mane of Shiv Sena)

मूळ कॉंग्रेसवासी असलेल्या माजी आमदार दिलीप माने यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. शिवसेना नेत्यांच्या घरी राष्ट्रवादीचे दोन दिग्गज मंत्री आल्याने माने यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदार संघातील भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या आमदारकीची मुदत 1 जानेवारी 2022 रोजी पूर्ण होत आहेत. अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या या विधान परिषद निवडणुकीसाठी असलेल्या प्रमुख इच्छुकांमधील विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून माजी आमदार दिलीप माने यांचे नाव आघाडीवर आहे. 

दिलीप माने हे शिवसेनेत आहेत आणि सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. विजयासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व युक्ती आणि शक्ती वापरण्याची धमक माजी आमदार माने यांच्यात असल्याने विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. माजी आमदार माने कोणत्याही पक्षात असोत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचे वैयक्तिक संबंध त्यांनी चांगल्या पद्धतीने जपले आहेत. 

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती, महापालिका व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांच्यावर सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकांची जबाबदारी सोपविली आहे. आता माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला सोलापूर शहर व परिसरासाठी तगडे नेतृत्व मिळण्याची शक्‍यता आहे. 

विधीमंडळात पुन्हा प्रवेशाची अपेक्षा 

कॉंग्रेसच्या चिन्हावर दिलीप माने हे 2009 मध्ये पहिल्यांदा दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आमदार झाले. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांना सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर  2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी माने यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदार संघातून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत माने यांना अपयश आले. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार माने हे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे वारंवार समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून माने यांना पुन्हा विधीमंडळात एन्ट्री मिळेल, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगू लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com