कल्याण काळे यांच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता 

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील 22 ग्रामपंचायतींमध्ये काळे गटाचे अनेक सदस्य निवडून आले आहेत. याच भागात साखर कारखान्याचे संचालक व कर्मचारी वर्गाची संख्यादेखील अधिक आहे.
BJP leader Kalyan Kale's neutral role regarding Pandharpur by-election
BJP leader Kalyan Kale's neutral role regarding Pandharpur by-election

पंढरपूर : पंढरपूर तालुक्‍याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे हे अजूनही तटस्थ आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत ते कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. कल्याण काळे हे सध्या महाविकास आघाडी व भाजप या दोन्ही उमेदवारांच्या बैठका व प्रचारापासून अलिप्त आहेत. आगामी काळात काळे कोणती भूमिका घेतात आणि आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात, हे पाहावे लागणार आहे. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वतः निवडणुकीला सामोरे न जाता, भाजप उमेदवार, उद्योजक समाधान आवताडे यांच्या मागे आपली शक्ती उभी केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपत आलेले कल्याण काळे व त्यांचे कार्यकर्ते पोटनिवडणुकीपासून चार हात लांब आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात आणखी अस्वस्थता वाढली आहे. 

माढ्यातून 60 हजार मते घेतली 

कल्याण काळे यांचे दोन साखर कारखान्यांसह अनेक ग्रामपंचायती, दोन पतसंस्था व काही शैक्षणिक संस्थांवर वर्चस्व आहे. त्यांनी 2014 मध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पुन्हा कॉंग्रेसकडून माढा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना सुमारे 60 हजारांहून अधिक मते मिळाली होती. 

काळे गटाची भूमिका का महत्त्वाची 

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील 22 ग्रामपंचायतींमध्ये काळे गटाचे अनेक सदस्य निवडून आले आहेत. याच भागात साखर कारखान्याचे संचालक व कर्मचारी वर्गाची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे काळे गटाची पोटनिवडणुकीतील राजकीय भूमिका महत्वाची मानली जाते. 

अजित पवारांशी वाढती जवळीक 

भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे पंढरपुरात 30 मार्च रोजी मेळावे झाले. या दोन्ही मेळाव्याकडे काळे व त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यांच्या अनुपस्थितीची दोन्ही ठिकाणी चर्चादेखील झाली. मागील काही दिवसांपासून काळे भाजपपासून दूर गेले आहेत. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काळेंची जवळीक वाढली आहे. असे असले तरी कल्याण काळे यांनी अजूनही आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे काळे गटाच्या भूमिकेकडे दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

लवकरच बैठक होणार 

पंढरपूर पोटनिवडणुकीसंदर्भात कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी कल्याण काळे लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये ते काळे गटाची भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. 

सध्या मी कामानिमित्ताने बाहेरगावी आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसंदर्भातील माझी भूमिका मी लवकरच स्पष्ट करणार आहे. 
-कल्याण काळे, भाजप नेते 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com