लोकसभेला लयं जणांनी माझी मज्जा केलीय, त्याचे उट्टे काढण्यासाठीच मी आलोय! 

प्रस्थापिताविरुद्ध बोलण्याचे धाडस होत नव्हते.
MLA Sanjay Shinde criticizes Mohite Patil without naming him
MLA Sanjay Shinde criticizes Mohite Patil without naming him

मंगळवेढा (जि. सोलापूर) : लोकसभा निवडणुकीत लयं जणांनी माझी मज्जा केली आहे, पण त्या निवडणुकीला भारतनानांनी इमानदारीने मला मदत केली आहे. नानांच्या त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी, तसेच लोकसभेला नाकात बोटे घातलेल्यांचे उट्टे काढण्याची वेळ आल्याने या निवडणुकीत भगिरथ भालके यांना मदत करण्यासाठीच मी आलो आहे, असे आमदार संजय शिंदे यांनी सांगितले. 

पंढरपूर पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर आमदार संजय शिंदे बोलत होते. भगिरथ भालके यांच्या जनसंवाद यात्रेच्या दरम्यान मंगळवेढ्यातील कार्यक्रमात आमदार संजय शिंदे हे आग्रह करूनही बोलले नव्हते. आमदार संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांचा दोस्ताना संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला परिचित होता. परंतु त्यांच्या मौनामागे काय दडले आहे, याची चर्चा कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात रंगली होती. 

मंगळवेढ्यातील अनुभव पाहता आमदार संजय शिंदे आज काय बोलणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यांनी लोकसभेतील पराभवाबद्दल व त्यांना आलेल्या कटू अनुभवाचा स्पष्ट शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, मी जे बोलतो, ते रोखठोक बोलतो. जिल्ह्यातील अनेक नेत्यांना माहिती आहे की, पुढे एक आणि मागे एक असा करणारा मी नाही. माझे बोलणे कमी आणि काम जास्त आहे. पंढरपूर मतदारसंघातील मतदार सुज्ञ आहेत.

आताचे सोडा 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीचा स्कायलॅब माढा मतदारसंघावर पडणार होता. नायतर पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पडणार होता. प्रस्थापिताविरुद्ध बोलण्याचे धाडस होत नव्हते. त्याची चर्चा करण्याकरिता नगरसेवक चेतन नरोटे यांच्या सोलापुरातील पत्रा तालमीच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मी आणि भारतनाना 2008 मध्ये कुणाला कळू नये; म्हणून एकत्र आलो होतो. त्या वेळीच आमचं ठरलं होतं. माढ्यात आले की मी ताणायचे आणि पंढरपूर-मंगळवेढ्यातून तुम्ही (भारतनानांनी) सोडायचं नाही, असे नाव न घेता विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तत्कालीन उमेदवारीचा समाचार घेतला. 

लोकसभा निवडणुकीला भारतनानांनी मला इमानदारीने मदत केली. राजकीयदृष्ट्या त्यांचा माझ्याबरोबर कधीच खटका उडाला नाही; परंतु माझी आणि त्यांची भूमिका जिल्ह्यातील प्रस्थापितांविरोधात लढण्याची होती. विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत प्रत्येक गावचे माजी सरपंच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर एकत्र आले होते. परंतु नानाने ती निवडणूक पंचवीस तीस हजाराच्या फरकाने जिंकली होती. आजच्या निवडणुकीसाठी ते दोघे एकत्र आले आहेत, त्यामुळे "त्यांना निवडणुकीची पुन्हा तल्लफ होऊ नये', अशा पद्धतीने भगीरथ दादाला मतदान करून विजयी करण्याचे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीतील गमतीजमतीबरोबर अनेक राजकीय घडामोडी प्रचारसभेच्या निमित्ताने उघड करणार असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com