माजी खासदार जयसिंगराव गायकवाडांवर राष्ट्रवादीने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
Appointment of Jaysingrao Gaikwad as the Liaison Head of Marathwada Division of NCP
Appointment of Jaysingrao Gaikwad as the Liaison Head of Marathwada Division of NCP

मुंबई : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा विभागाचे ‘संपर्क प्रमुख’ म्हणून जयसिंगराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. २७ मे) त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. (Appointment of Jaysingrao Gaikwad as the Liaison Head of Marathwada Division of NCP)

जयसिंगराव गायकवाड हे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे ते पक्षावर चिडून होते. या निवडणुकीच्या दरम्यान गायकवाड यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे विक्रमी मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला होता.

त्यानुसार हे चव्हाण हे विक्रमी मतांनी निवडून आले होते. त्यासाठी माजी खासदार गायकवाड यांनी मराठवाडा विभागातील पाच जिल्ह्यांत जाऊन सतीश चव्हाण यांचा जोरदार प्रचार केला होता. त्यांनी प्रत्येक सभेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत पक्षातील बंडखोरी आणि बेबनावावरही प्रहार केला होता.

गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानुसार पक्षाने त्यांच्या मराठवाड्याची जबाबदारी सोपवली आहे. गायकवाड यांना स्वजिल्हा असलेल्या बीडसह मराठवाड्यातील पक्षाच्या नेत्यांशी समन्यव साधून काम करावे लागणार आहे. 

राज्यात असलेल्या सत्तेचा वापर करून ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कुमकवत आहे, अशा ठिकाणी गायकवाड यांना काम करावे लागणार आहे. ते पूर्वी राष्ट्रवादी पक्षात होते, त्यामुळे त्यांना पक्षातील नेत्यांशी जुळवून घेण्यास फारसे कष्ट पडणार नाही. पण महत्वकांक्षी नेत्यांशी समन्वय साधूनच त्यांना पक्ष संघटना वाढविण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांना पक्ष संघटनेचा प्रदीर्घ काळ अनुभव आहे. त्यांचा अनुभव मराठवाडा विभागात पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र दिल्यानंतर व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com