बबनदादा शिंदे यांची आमदारकी वाचली : उजनीचा लेखी आदेश निघाला - A written order was finally issued to cancel the decision to supply water to Indapur from Ujani | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

बबनदादा शिंदे यांची आमदारकी वाचली : उजनीचा लेखी आदेश निघाला

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 27 मे 2021

आता बबनदादांना आमदारकीचा राजीनामा देण्याची गरज भासणार नाही.

पुणे :  उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केलेले 5 टीएमसी पाण्याचा आदेश आज (ता. २७ मे) रद्द करण्यात आला. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी याबाबतचा लेखी आदेश काढला आहे. (A written order was finally issued to cancel the decision to supply water to Indapur from Ujani)

दरम्यान, उजनी धरणाच्या पाण्यासाठी आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, उमेश पाटील, दीपक साळुंखे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी याबाबतचा लेखी आदेश लवकर न निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. आता लेखी आदेश निघाल्याने बबनदादांना आमदारकीचा राजीनामा देण्याची गरज भासणार नाही.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत राडा : उद्धव ठाकरे आणि पवारांपर्यंत तक्रारी

उजनीतून इंदापूरला पाणी वळवण्यास सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. विविध शेतकरी संघटनांनी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलनही केले होते. भारतीय जनता पक्षाबरोबरच महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनीही विरोध दर्शवला होता. या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात एकाकी पडल्याचे चित्र होते. विशेषतः इंदापूरचे लोकप्रतिनिधी आणि सोलापूरचे पालकमंत्री असलेले दत्तात्रेय भरणे यांच्याविषयी जिल्ह्यात असंतोष वाढत चालला होता. त्यांना इंदापूर आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी वेगवेगळी भूमिका वठवावी लागत होती. 

सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यावर आंदोलक शेतकऱ्यांचे समाधान झाले नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत हे पाणी रद्द झाल्याचा शासकीय अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामती येथील निवासस्थान असलेल्या गोविंद बागेसमोरही बुधवारी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

त्यानुसार उजनी धरण बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या दारात आंदोलनाला बसले होते. उजनी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते इस्लामपूर येथील मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते. या वेळी पोलिसांनी कारखान्यावर आंदोलन करण्यास मज्जाव केल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या आंदोलनाची दखल घेत पाटील यांनी त्वरित हा आदेश रद्द केला. त्यानंतर आंदोलकांकडून हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.. 

दरम्यान, जलसंपदा विभागाने आज (ता. २७ मे) उजनी धरणातून इंदापूरला मंजूर केलेले पाच टीएमसी पाणी रद्द करत सल्याचा लेखी आदेश काढला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयाचे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलक  आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख