दिवसभऱ रुग्ण सेवा केली...रात्री कोरोना पॅाझिटिव्ह अन् पहाटे तरूण डॅाक्टरचा मृत्यू - Young doctor dies due to covid complications within hours | Politics Marathi News - Sarkarnama

दिवसभऱ रुग्ण सेवा केली...रात्री कोरोना पॅाझिटिव्ह अन् पहाटे तरूण डॅाक्टरचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

सीटी-स्कॅनमध्ये त्यांच्या मेंदुत रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेने भयावह रुप धारण केले आहे. यामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढण्यासह रुग्णांना इतर आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. रुग्ण बरे झाल्यानंतर आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. तसेच संसर्ग झाल्यानंतर अनेक रुग्णांना काही तासांत प्रचंड त्रास जाणवत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये समोर आली आहे. (Young doctor dies due to covid complications within hours)

दिल्लीतील गुरू तेज बहादुर रुग्णालयातील 26 वर्षांचे डॅा. अनस मुजाहिद यांचा रविवारी अचानक मृत्यू झाला. त्यांनी शनिवारी दुपारपर्यंत रुग्णालयातील कोविड रुग्णांची सेवा केली होती. त्यानंतर ते सहकाऱ्यासोबत इफ्तारसाठी घरी गेले. घरून हॅाटेलमध्ये परत येत असतानाच त्यांना ताप असल्याची जाणीव झाली. म्हणून ते मित्रासह रुग्णालयातील क्लिनिकमध्ये गेले. तिथे त्यांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली.

हेही वाचा : शेतकरी आंदोलनात तरूणीवर बलात्कार अन् कोरोनामुळं मृत्यू

अॅन्टीजेन चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला. रात्री आठ वाजता ही चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर काही वेळातच डॅाक्टरांना अचानक त्रास होऊ लागला. ते जमिनीवर कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. पण त्यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना तातडीने सीटी-स्कॅनसाठी पाठवण्यात आले. सीटी-स्कॅनमध्ये अनस यांच्या मेंदुत रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. 

तिथून त्यांना तातडीने मेंदुविकार विभागात हलवण्यात आले. पण पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डॅा. अनस यांचा मृत्यू झाला. त्यांचे सहकारी डॅा. अमीर सोहेल हे त्यांच्यासोबत होते. त्यांनीच ही घटना अनस यांच्या कुटूंबियांना कळविली. काही तासांपूर्वी इफ्तारसाठी घरी आलेल्या अनसच्या मृत्यूने कुटू्ंबियांनाही मोठा धक्का बसला. रुग्णालयातील डॅाक्टरांसाठीही अनस यांचा मृत्यू धक्कादायक आहे. अनस यांनी जानेवारी महिन्यातच MBBS ची इंटर्नशिप पूर्ण केली होती. 

रुग्णालयातील डॅा. ए. के. जैन म्हणाले, 'डॅा. अनस आमच्यासोबत नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे. त्यांच्या वैद्यकीय अहवालांचा अभ्यास केला जाईल.' डॅा. सतेंद्र सिंग यांनीही ही दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले. तीव्र लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये साधारणपणे रक्ताच्या गुठळ्या होणे किंवा अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ही घटना इशारा देणारी आहे. अनस यांच्या मित्रानुसार ते शनिवारपर्यंत ठीक होते, असेही सिंग यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख