धक्कादायक : शेतकरी आंदोलनात तरूणीवर बलात्कार अन् कोरोनामुळं मृत्यू - West Bengal girl raped in delhi farmers protest tikri border | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

धक्कादायक : शेतकरी आंदोलनात तरूणीवर बलात्कार अन् कोरोनामुळं मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

तरूणी पश्चिम बंगालमधील असून सामाजिक कार्यकर्ती होती.

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागील काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका तरूणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा (Covid-19) संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर ही बाब समोर आली. उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला आहे. (West Bengal girl raped in farmers protest Tikri border Delhi)

तरूणी पश्चिम बंगालमधील असून सामाजिक कार्यकर्ती होती. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ती काही सहकाऱ्यांसह 10 एप्रिल रोजी टिकरी सीमेवर दाखल झाली होती. तिच्यासोबत आलेले अनूप आणि अनिल मलिक यांच्यासह सहा जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसान सोशल आर्मी या नावाने त्यांचा गट कार्यरत होता. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हेही वाचा : अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात; चौकशीसाठी नेमलेल्या समितीला दिवाणी अधिकार

तरूणीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. पण काही दिवसांतच 30 एप्रिल रोजी तरूणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तरूणीच्या वडिलांनी याप्रकरणी बहादुरगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनूप आणि अनिल मलिक यांच्यासह चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींवर अपहरण, ब्लॅकमेलिंग, धमकी देणे, सामुहिक बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चार शेतकरी नेते व दोन स्वयंसेवक महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत संयुक्त किमान मोर्चाने निवेदन प्रसिध्द केले आहे. टिकरी सीमेवर आल्यानंतर संबंधित महिलेवर हल्ला करून बलात्कार केला. त्यानंतर आठवडाभराने महिलेला कोरोनाची लक्षणे आढळली. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

किसान मोर्चाकडून किसान सोशल आर्मीचे टेंट आणि बॅनर टिकरी सीमेवरून हटवण्यात आले आहेत. आरोपींना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले असून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे, असेही किसान मोर्चच्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख