जोतिरादित्य, जितिन यांच्यानंतर पायलट यांना तरी काँग्रेस थांबवणार का? - Will Congress succeed in stopping Sachin Pilot trend in social media | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

जोतिरादित्य, जितिन यांच्यानंतर पायलट यांना तरी काँग्रेस थांबवणार का?

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जून 2021

राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे जितिन प्रसाद यांनी बुधवारी भाजपमध्ये पवेश केला.

जयपूर : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडला सुरूंग लावण्यात भाजपला यश आलं आहे. मध्य प्रदेशातील जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) आणि उत्तर प्रदेशातील जितिन प्रसाद (Jitin Prasad) हे भाजपला गळाला लागले. आता या यंग ब्रिगेडमधील महत्वाचे नेते असलेले सचिन पायलट यांचा पुढचा नंबर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरही त्यावरून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यामुळे पायलट यांना थांबवण्यात काँग्रेसला यश मिळणार का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Will Congress succeed in stopping Sachin Pilot trend in social media)

राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे जितिन प्रसाद यांनी बुधवारी भाजपमध्ये पवेश केला. त्याआधी जोतिरादित्य यांची समजूत काढण्यातही काँग्रेस नेतृत्वाला अपयश आल्याने त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. त्यानंतर सचिन पायलट यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्याविरोधात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद चांगला पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : ज्येष्ठ नेत्याला घरी लस कुणी दिली? उच्च न्यायालयाची मुंबई उच्च न्यायालयाला विचारणा

सचिन पायलट यांनीही यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दहा महिने होऊनही दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. समितीने मला आमच्या मागण्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, याचे आश्वासन दिले होते. पण सरकारचा अर्धा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अजूनही निर्णय झालेला नाही. राजस्थामध्ये पक्षाला बहुमत मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाज ऐकला जात नाही, हे दुर्दैवी आहे, अशी नाराजी पायलट यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली आहे. 

गेहलोत व पायलट यांना एकाचवेळी खूश ठेवणे पक्षासाठी कठीण जाऊ लागले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करुन समजूत काढल्याने पायलट आणि त्यांचे 18 बंडखोर पक्षात परतले होते. भाजपने पायलट यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्यावेळी गेहलोत यांच्यासह काही नेत्यांनी केला होता. 

आता मागील काही दिवसांपासून पायलट समर्थकांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. काही बैठका पायलट यांच्या निवासस्थानी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे पायलट हे पुन्हा बंड करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पायलट यांनी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केल्याचे समजते. तसेच समर्थक आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियांका गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. तोपर्यंत पुन्हा हे आमदार बंड करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आमदारांनी जुलै महिन्यापर्यंत श्रेष्ठींना अल्टीमेटम दिला जाऊ शकतो. त्यानंतर पायलट व हे आमदार पक्षात राहण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख