तौते चक्रीवादळाचा धुमाकूळ; गुजरातमध्ये तिघांचा मृत्यू, 16 हजार घरांचे नुकसान तर 40 हजार झाडे पडली - Three people have lost their lives due to Tauktae Cyclone in Gujrat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

तौते चक्रीवादळाचा धुमाकूळ; गुजरातमध्ये तिघांचा मृत्यू, 16 हजार घरांचे नुकसान तर 40 हजार झाडे पडली

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 मे 2021

रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हे वादळ गुजरात किनारपट्टीवर आदळले.

अहमदाबाद : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गुजरात किनारपट्टीला धडकले. या वादळाने गुजरामधील किनारपट्टीलगतच्या सर्वच जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला आहे. वादळामुळं आतापर्यंत गुजरातमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 40 हजारांहून अधिक झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच 16 हजार 500 हून अधिक घरांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली आहे. (Three people have lost their lives due to Tauktae Cyclone in Gujrat)

केरळ, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्राला तडाखा दिल्यानंतर तौत चक्रीवादळाची तीव्रता अधिकच वाढत गेली. गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असताना या वादळाने अधिकच रौद्र रुप धारण केलं होतं. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हे वादळ गुजरात किनारपट्टीवर आदळले. पुढील जवळपास चार तास वादळाच्या केंद्रबिंदुला अरबी समुद्रातून किनारपट्टी ओलांडण्यास लागला. यावेळी किनारपट्टी भागात ताशी 180 किमी वेगाने वारे वाहत होते. तर अन्य भागात ही तीव्रता ताशी 150 ते 160 किमी एवढी होती. 

हेही वाचा : मोठी बातमी : कोरोना उपचारातून 'प्लाझ्मा थेरपी'ला वगळले

किनारपट्टीला वादळ धडकण्यापूर्वी प्रशासनाने सुमारे दोन लोक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. तीव्र वेगाने वारे वाहिल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हजारांहून अधिक झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच 16 हजार 500 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. अनेक भागातील वीजेचे खांब कोसळल्याने अनेक भागातील वीज गायब झाली आहे. NDRF तसेच लष्कराकडून तातडीने मदत सुरू करण्यात आली आहे. रात्री दक्षता म्हणून सर्व प्रमुख विमानतळं बंद ठेवण्यात आली होती. तसेच कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

वादळाची तीव्रता कमी

गुजरातची किनारपट्टी पार केल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होत चालली आहे. सध्या हे वादळ सौराष्ट्रवर घोंघावत असून या भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राजस्थान आणि हरयाणालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दिल्लीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, कोकणची दैना

तौते चक्रीवादळाचा कोकण व मुंबईला जोरदार फटका बसला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाने नागरिकांची दैना उडाली. हजारो झाडे पडल्याची घटना घडल्या असून राज्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोकण किनारपट्टीलगत अनेक घरांचे नुकसान झाले आहे. वीज यंत्रणेचेही नुकसान झाल्याने अनेक भागातील वीज गायब झाली आहे. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख