मोठी बातमी : कोरोना उपचारातून 'प्लाझ्मा थेरपी'ला वगळलं

सुरूवातीच्या नियमावलीनुसार मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना लक्षणे दिसल्यापासून सात दिवसांमध्ये प्लाझ्मा थेरपीला वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
National Task Force revised Clinical Guidance dropped Convalescent plasma
National Task Force revised Clinical Guidance dropped Convalescent plasma

नवी दिल्ली : मागील वर्षभरापासून रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या लाखो कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येत असलेली 'प्लाझ्मा थेरपी' बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्ण लवकर बरे होण्यात किंवा त्यांचा मृत्यू रोखण्यासाठी प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) परिणामकारक नसल्याचे केंद्रीय टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सुधारीत उपचार नियमावलीमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं आहे. (National Task Force revised Clinical Guidance dropped Convalescent plasma)

मागील आठवड्यामध्ये टास्क फोर्सची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये टास्क फोर्समध्ये समावेश असलेले वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ, डॅाक्टर्स अशा बहुतेकांनी प्लाझ्मा थेरपीला उपचारपध्दतीतून वगळण्याबाबत आपलं मत मांडलं होतं. त्यानुसार राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत सोमवारी जाहीर केलेल्या सुधारीत नियमावलीमधून प्लाझ्मा थेरपीला वगळले आहे. 

सुरूवातीच्या नियमावलीनुसार मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना लक्षणे दिसल्यापासून सात दिवसांमध्ये प्लाझ्मा थेरपीला वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला होता. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक नातेवाईक स्वत:हून डॅाक्टारांना प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याबाबत आग्रह धरत होते. तसेच अनेक रुग्णालयांमध्येही अनेक रुग्णांवर याचा वापर केला जात होता. त्यामुळं प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला होता. 

प्लाझ्मा दान करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडूनही कोरोनामुक्त नागरिकांना आवाहन केले जात होते. काही डॅाक्टरांकडून प्लाझ्माचा उपयोग होत असल्याचा दावाही करण्यात आला. त्यामुळे प्लाझ्मासाठीही रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपेढ्यांमध्ये पायपीट करावी लागत होती. सोशल मीडियावरही अनेक जण प्लाझ्माची मागणी करणारी पोस्ट टाकत होते. त्यासाठी काही सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतला होता.

आता प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नसल्याचे टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. अनेक शास्त्रज्ञांनी प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र लिहून कोरोनाच्या अशास्त्रीय वापराबाबत इशारा दिला होता. त्यामुळे आयसीएमआरने उपचार पध्दतीनतून प्लाझ्माला वगळले आहे. आयसीएमआरच्या नियमावलीनुसार रुग्णांचे तीन भाग करण्यात आले आहे. त्यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृह विलगीकरण, मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये तर तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com