पूजाच्या मृत्यूप्रकरणी मंत्र्याशी बोलणाऱ्या अरुण राठोडच्या घरी एक लाख 80 हजाराची चोरी - Theft of Rs 1.8 from the house of Arun Rathore, who is in focus after the death of Pooja Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

पूजाच्या मृत्यूप्रकरणी मंत्र्याशी बोलणाऱ्या अरुण राठोडच्या घरी एक लाख 80 हजाराची चोरी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवीन मुद्दे पुढे येत आहेत. 

बीड : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणात प्रमुख माहीतगार असलेला अरूण राठोड याचा शोध पोलिस घेत आहेत. या मृत्यू प्रकरणामध्ये कथित मंत्र्यासोबत राठोडचा संवाद असल्याने तो एकदम झोतात आला. मात्र त्याच्या कुटुंबाला याचा फटका बसला असून त्याच्या घरातून एक लाख रुपयांची रोकड आणि 80 हजाराचे सोने चोरीला गेल्याची फिर्याद पोलिसांकडे झाली आहे.

अरुण राठोडचे घर हे परळीपासून जवळ असलेल्या धारावती तांडा येथे आहे. पूजा चव्हाण मृत्यप्रकरणात अरुणचे नाव चर्चेत आल्यानंतर कुटुंबीय धास्तावले होते. ते घराला कुलूप लावून बाहेर गेले. ते चार दिवसानंतर घरी परतले. त्यावेळेस त्यांच्या घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. तर गेटचे कुलूपसुद्धा तुटलेल्या अवस्थेमध्ये होते.

याबाबत परळीचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल शहाणे यांनी सांगितले की अरुण राठोडच्या घरामध्ये 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार आली आहे. त्यामध्ये एक लाख रुपये आणि 80 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचं तक्रारीमध्ये म्हटले आहे. 

ही बातमी वाचा : पूजावर किती रुपयांचे कर्ज होते?

अरुण राठोड याच्याशी बोलतानाच संबंधित मंत्री पूजाचा मोबाईल ताब्यात घेण्याच्या सूचना करताना ऐकू येत होते. पोलिसांनी त्याचा जबाब घेतला असून त्याच्या जबाबात पूजाने मद्य प्राशन केल्याचे म्हटले होते. त्याच्या मोबाईलमधील सर्व आॅडिओ क्लिप एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने घेऊन त्या व्हायरल केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणातील गंभीरपणा अनेकांच्या लक्षात आला. तो वनखात्याचा कर्मचारी असल्याचेही बोलले जाते. मात्र त्यास दुजोरा मिळू  शकला नाही. पोलिस त्याला जबाबसाठी पुन्हा बोलविणार होते. पण तो गायब असल्याने अद्याप पुरवणी जबाब होऊ शकला नाही. 

विरोधी पक्षांनी या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना लक्ष्य केले असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी तातडीने घ्यावा, यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे हे पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून पूजाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्य म्हणून नोंद केली आहे. संजय राठोड हे येत्या गुरूवारी (ता. 18) या साऱ्या प्रकारावार प्रसिद्ध माध्यमांशी पोहरादेवी येथे बोलणार असल्याच्या त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यामुळे अरुण राठोड आणि मंत्री संजय राठोड यांचा संबंध काय, यावर तेच प्रकाश टाकू शकतील. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख