पूजाच्या मृत्यूमागे हे पण कारण? पोल्ट्री व्यवसाय बुडाला, 17-18 लाखांच्या कर्जाचाही बोजा - Poultry business sank, debt burden of Rs 17-18 lakh are thr reasons for death of pooja | Politics Marathi News - Sarkarnama

पूजाच्या मृत्यूमागे हे पण कारण? पोल्ट्री व्यवसाय बुडाला, 17-18 लाखांच्या कर्जाचाही बोजा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

खरे कारण कधी कळणार? 

पुणे : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी माझ्या मुलीचे नाव विनाकारण कोणत्या नेत्याशी जोडून तिला बदनाम करू नका, असे आवाहन करतानाच आर्थिक समस्येमुळे तिने आत्महत्या केल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी दिलेल्या तिने सोरायसीस आजारामुळे आत्महत्या केल्याचा जबाब तिच्या वडिलांनी दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे पूजाला नक्की कोणत्या अडचणी होत्या, यावरील थेट उत्तर अद्याप मिळालेले नाही.

पूजा चव्हाणच्या मृत्यनंतर राजकीय वाद निर्माण सुरू झाले आहेत. तिच्या घरच्यांनाही त्याचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. पण तिच्या मृत्यूनंतर सोशल मिडियात फिरणाऱ्या आॅडिओ क्लिपमुळे संशयाचे वातावरण तयार झाले. भाजपने या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. त्यात राठोड हे गेले आठवडाभर गायब असल्याने त्यांचीही या प्रकरणातीन बाजू पुढे आलेली नाही. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर तिच्या वडिलांनी काही बाबी स्पष्ट केल्या. त्यात पूजाच्या मृत्यूनंतर तिची बदनामी थांबवा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली. यात पूजा ही आपले सर्व व्यवहार पाहायची. तिचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर खूप वाईट वाटले. आम्ही घटनास्थळी सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास पोहोचलो. तिथे गेल्यानंतर तिच्या मृत्यूचे कळाले. 

‘मला बीपीचा त्रास आहे. त्यामुळे सर्व कामं, व्यवहार पूजा हे पाहायची. माझ्या मुलीच्या नावावर मी पोल्ट्रीसाठी कर्ज घेतलं होतं. जवळपास 17 ते 18 लाख रुपयांच कर्ज होतं. लॉकडाऊनमुळे पोल्ट्री बंद झाली होती. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईकांकडून पैसे घेऊन सावरण्याचा प्रयत्न केला. तर बर्ड फ्लू आला. त्यामुळे पूजा तणावात होती. एवढे पैसे फेडायचे कसे? हा तिच्यासमोर प्रश्न होता,`` अशी भूमिका त्यांनी मांडली.

या कर्जवसुलीसाठी बॅंकांनी तगादा लावला होती. याबाबत कोणीच मदत केली नाही. यात कोणी मदत दिली असती तर माझी मुलगी वाचली असती. पूजा कधीच स्वतःचं दुःख दुसऱ्याला दाखवत नव्हती,``अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सोशल व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्सवर देखील त्यांनी संशय घेतला आहे.

‘हे राजकारणंही असू शकतं. माझ्या मुलीला नाहक बदनाम केले जात आहे. कोणासोबत तरी माझ्या मुलीचं नाव जोडून काही लोक मुद्दामहून आमची बदनामी करत आहेत. आमचा समाज म्हणतोय हे राजकारण आहे. माझी बदनामी होण्यासाठी. माझी मुलगी तर गेली ना, माझं काय आहे? पण आता बदनामी थांबवली पाहिजे. त्यांना काय मिळतंय, काय साधत आहेत? ज्याला दुःख झालंय त्याला हे आणखी दुखवत आहेत. आई-वडिलांची अवस्था काय आहे. तिची आई बेशुद्ध आहे. कोणाला काय सांगावं काहीच कळत नाही,``असे दुःख त्यांनी मांडले. 

संजय राठोड दोन दिवसांनी प्रगटणार

राज्याचे वनमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड कुठे आहेत, कुठे आहेत संजय राठोड, हा प्रश्न राज्यभर किंबहुना देशभर विचारला जातोय. काही माध्यमांवर यावर चर्चा घेतली जातेय. कुणी सांगतोय की, ते मुंबईला आहेत. तर कुणी म्हणतो राज्याच्या बाहेर आहे. सध्या ते कुठेही असोत, पण दोन दिवसांनी ते पोहरा देवी येथे येणार असल्याची माहिती ‘सरकारनामा’ला प्राप्त झाली. 

पोहरा देवी हे वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गाव आहे. बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर येथे आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरा देवीची ओळख देशभर आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. संजय राठोड दोन दिवसांनी येथे येऊन समाजबांधवांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. बंजारा समाजबांधवांसाठी संजय राठोड हे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांची राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे देशभरातील बंजारा समाजबांधव त्यांच्या सोबत आहेत, असा संदेश पोहरादेवीतून दिला जाणार असल्याचेही सूत्र सांगतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख