उजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी....सुप्रिया सुळेंचा पुढाकार

उजनीच्या जलाशयाचा वापर जल-हवाई वाहतूकीसाठी करता येणे शक्य आहे.
ujani18.jpg
ujani18.jpg

दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघातील उजनीच्या जलाशयाचा वापर जल-हवाई वाहतूकीसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा समावेश 'उडान-रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम' मध्ये करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन सुळे यांनी याबाबत लेखी निवेदन दिले आहे. उजनीचा जलसाठा इंग्रजी झेड अक्षराच्या आकाराचा असून पुरेसा खोल व विशाल आहे. याशिवाय पाण्यावर विमाने उतरण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण देखील येथे उपलब्ध आहे. जलसाठ्याच्या रचनेमुळे विमानांची उड्डाणे व उतरणे शक्य होईल, असे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

उजनीच्या जलसाठ्यापासून पुण्यातील लोहगाव विमानतळ १२५ कि.मी‌. अंतरावर आहे. याबरोबरच महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर ही धार्मिक स्थळेही जवळच आहेत. याठिकाणी विमानांची वाहतूक सुरु झाल्यास त्याला उत्तम प्रतिसाद मिळू शकेल. 

जवळ असलेल्या नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि मुंबई या विमानतळांना जोडणारे ठिकाण म्हणून हा जलसाठा विकसित होऊ शकेल. तसेच गोवा, ठाणे क्रिक, साबरमती वॉटर-फ्रंट आणि सरदार सरोवरातील प्रस्तावित व सध्या अस्तित्वात असणाऱ्या जल-हवाई केंद्रांना जोडणारे हे ठिकाण ठरु शकेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

भिगवण येथील पक्षी अभयारण्य (बर्ड सँक्चुरी) हे अंतर पुरेसे दूर आहे. हे लक्षात घेता उजनी जलसाठ्याचा समावेश 'उडान-रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम' मध्ये करावा, अशी मागणी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पुरी यांना भेटून केली. या मागणीवर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास आहे, असे सुळे यांनी कळविले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com