नारायण राणे दिल्लीला गेलेच नाहीत... केंद्रीय मंत्रीमंडळात समावेशबाबत अद्याप अनिश्चितता! - Narayan Rane not in New Delhi for inclusion in cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नारायण राणे दिल्लीला गेलेच नाहीत... केंद्रीय मंत्रीमंडळात समावेशबाबत अद्याप अनिश्चितता!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 जून 2021

भाजपकडून अनेक नावांवर सध्या चर्चा सुरू... 

पुणे : केंद्रिय मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे दिल्लीत गेले असल्याची चर्चा होती. मात्र राणे हे मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राणे यांचे नाव केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात निश्चित झाल्याचे सांगत त्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी माध्यमांत चर्चा रंगल्या होत्या. प्रत्यक्षात तसे नसल्याचे समोर आले आहे.

राणे हे काल सिंधुदर्गात होते. तेथून ते गोव्याला गेले आणि नंतर मुंबईला पोहोचले. ते आजही तेथेच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राणे दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे उघड झाले आहे. दिल्लीतील राणे यांच्या निवासस्थानीही कोणतीच हालचाल नसल्याचे सांगण्यात आले. संभाव्य नावांची चर्चा असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे नेते हे संबंधितांना त्यासाठी बोलावून घेतात, असे काही नसल्याचे एका राजकीय निरीक्षकाने स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विस्ताराविषयी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मंत्रीमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस हे मोदी यांना गेल्या दहा दिवसांत दोन वेळा भेटले. तसेच इतर राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते यांच्याशीही मोदींनी चर्चा केल्याचे समजते आहे. त्यातून काही नावांविषयी आडाखे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात राणेंचे नाव आघाडीवर आहे. मात्र मोदी हे अनेकदा धक्कातंत्र अवलंबतात. त्यामुळे माध्यमांतून चर्चिली जाणारी नावे त्यांच्या यादीत हमखास नसतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे राणे यांच्या नवीन राजकीय इनिंगचे काय होणार, याची उत्सुकता आहे.

वाचा ही बातमी : पुढील साडेतीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार... 

नंदुरबारच्या खासदार डाॅ. हिना गावित यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, सांगलीचे संजयकाका पाटील आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्याही नावांना पसंती आहे. (New faces from Maharashtra may include in Modi Govt expansion) 

राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण राज्यातील सत्तांतराच्या धक्कादायक नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते.

राणेंना राज्यात फडणविसांच्या मंत्रीमंडळात घेण्यात शिवसेनेचा आधीच्या युती सरकारमध्ये प्रचंड विरोध होता. एवढेच नाहीतर राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यालाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊ शकले नव्हते. राणेंना राज्याच्या मंत्रीमंडळात न घेण्याच्या शिवसेनेच्या अटीमुळे त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले. तेथेही त्यांना फारशी संधी मिळाली नाही. या दोन पक्षांतील संबंध विकोपाला गेल्यानंतर राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे शिवसेनेला रोज झोडण्याचे काम इमाने-इतबारे करत आहेत. त्याचा फायदा राणेंना होणार का, याच त्यामुळे उत्सुकता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख