अमित शहांसोबत शरद पवारांची दिल्लीत खलबतं अन् राज्यात चलबिचल!

पंतप्रधान मोदी व शरद पवार यांची 17 जुलै रोजी भेट झाली होती.
अमित शहांसोबत शरद पवारांची दिल्लीत खलबतं अन् राज्यात चलबिचल!
Amit Shah and Sharad Pawar

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. सुरवातीला साखऱ संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर या दोघांमध्ये सुमारे 15 मिनिटे स्वतंत्रपणे चर्चा झाल्याचे समजते. पवारांनी पंधरा दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शहांचीही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (HM Amit Shah and NCP Chief Sharad Pawars meeting in Delhi)

पंतप्रधान मोदी व शरद पवार यांची 17 जुलै रोजी भेट झाली होती. ही भेट सरकारी बँका व कोरोनाशी संबंधित मुद्यांवर झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. पण या भेटीने राज्यात खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांकडूनच स्बवळाची भाषा सुरू झाल्यानंतर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले होते. आता पंधरा दिवसांतच शरद पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे. 

अमित शहा यांच्या भेटीवेळी शरद पवार यांच्यासोबत खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रीय सहकारी साखर फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर उपस्थित होते. या बैठकीत साखरेचे दर, इथेनॉल निर्मिती, साखर कारखाने व सहकारीशी संबंधित काही मुद्यांवर चर्चा झाल्याचे समजते. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. त्यानंतर शहा व पवार यांची पुन्हा स्वतंत्र बैठक झाली. 

दोघांमधील पंधरा मिनिटांच्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप या भेटीबाबत अधिकृतपणे कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असून तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे काही उदाहरणे समोर आली होती. त्यावरून भाजपने सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. सरकारकडून मात्र तिन्ही पक्षांचं सरकार स्थिर असून पाच वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, पेगॅसस मुद्यावरून विरोधकांकडून संसदेत गोंधळ घातला जात असल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाजात सतत अडथळे येत आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांची बैठक बोलावली होती. सकाळी झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनीही हजेरी लावली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in