कवी महानोरांचा गणपतरावांच्या आठवणींना उजाळा : भ्रष्टाचाराची सावलीही न पडलेला नेता

ना.धो. महानोर यांनी गणपतराव आबांच्या राजकीय आलेख अधोरेखीत केला आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-04T081136.203.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-04T081136.203.jpg

पुणे :  महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख Ganpatrao Deshmuk यांचे नुकतेच निधन झाले. देशमुख यांचे सहकारी माजी आमदार, रानकवी ना.धो. महानोर यांनी देशमुखांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  गणपतराव यांनी अडचणीच्या काळात सरकारला मदत केली. सभागृह तहकूब ज्यावेळी होत, तेव्हा मुख्यमंत्री, सभापती व इतर महत्त्वाचे मंत्री गणपतराव यांच्याशी चर्चा करीत हे मी पाहिले आहे. आरक्षणाचा विषय असो वा इतर राज्यासमोरील प्रश्न असोत त्यावर गणपतराव देशमुख मार्ग काढत. त्यांच्याकडे संसदीय कामकाज पद्धतीचे भांडार होते, अशा शब्दात महानोर यांनी गणपतराव आबांच्या राजकीय आलेख अधोरेखीत केला आहे. 

ना.धो. महानोर यांनी गणवतराव आंबाच्या राजकीय जीवनावर फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. ''पाणी आडवा - पाणी जिरवा, फलोत्पादन अभियानामध्ये गणपतराव देशमुख यांच्यासोबत मी काम केले. सोलापूर जिल्ह्यात १२१%  फलोत्पादन अभियान राबवले त्यामध्ये सांगोला तालुक्‍यात सर्वाधिक काम केले. पाणी सिंचनावर प्रचंड निष्ठा असलेला माणूस, महाराष्ट्राचे सभागृह पन्नास वर्षे समृद्ध करणारा व्यक्ती म्हणजे गणपतराव देशमुख. भ्रष्टाचाराची सावलीही त्यांच्यावर कधी पडली नाही,'' असे महानोर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ना. धो. महानोर म्हणतात...

१९६० च्या नंतर नव्या महाराष्ट्रात पन्नास वर्षे प्रत्यक्ष विधानसभेत दीर्घकाळ काम करणारा गणपतराव देशमुख यांच्या सारखा दुसरा आमदार नाही. नुसते आमदार म्हणण्यापेक्षा अभ्यासू, शेती, वीज, पाणी, सहकार यावर खोलवर जाऊन मांडणी करणारा ते मुख्यमंत्री व मंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेणारे होते. सभागृहातही अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करणारे आमदार होते. संसदीय कामकाज पद्धतीने ज्ञानाचे पुनर्भरण करणारे होते. मंत्री असताना शेतकरी कामगार पक्षावरील निष्ठा, शेतकऱ्यांशी बांधिल राहत मुख्यमंत्री, केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत. मंत्री असतानाही गणपतराव यांनी लाल दिवा कधीच वापरला नाही. त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी होती. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते नंतरच्या काळात गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या कर्तुत्वाने महाराष्ट्राला मोठ केलं.

यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासोबत शेतकऱ्यांची दिंडी... 
गणपतराव यांनी अडचणीच्या काळात सरकारला मदत केली. सभागृह तहकूब ज्यावेळी होत, तेव्हा मुख्यमंत्री, सभापती व इतर महत्त्वाचे मंत्री गणपतराव यांच्याशी चर्चा करीत हे मी पाहिले आहे. आरक्षणाचा विषय असो वा इतर राज्यासमोरील प्रश्न असोत त्यावर गणपतराव देशमुख मार्ग काढत. त्यांच्याकडे संसदीय कामकाज पद्धतीचे भांडार होते १९७८ ते ८४ या काळात एस. एम जोशी पुलोदचे अध्यक्ष होते व गणपतराव देशमुख मंत्री होते. त्यांनी स्वतः बंडिंग ची कर्जे, भूविकास बँकेची कर्जे - वीज बिले माफ केली. हा निर्णय घेण्यामध्ये गणपतराव देशमुख प्रमुख होते.
शरद पवार यांनी १९८० मध्ये सरकार गेल्यानंतर अन्नधान्याबाबत केंद्राने जे निर्णय घेतले ते शेतकऱ्यांना मारक होते. या विरोधात जळगाव ते नागपूर शेतकरी पायी दिंडी काढण्यात आली होती. यामध्ये शरद पवार, गणपतराव देशमुख, एन. डी पाटील, राजाराम बापू, मी सहभागी होतो. पंधरा किलोमीटर पायी चालणे, सभा घेणे असा कार्यक्रम सुरू होता. चालताना आमच्या पायाला फोड आले. ज्यांना त्रास होत असेल त्यांना गाडीत बसवत काही जण पायाला हात रुमाल बांधून चालले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, गणपतराव देशमुख यांच्यासह आम्हाला पोहरा बंदी येथे अटक करण्यात आली. शांततेच्या मार्गाने एक लाख शेतकऱ्यांची दिंडी काढली असताना अटक करण्यात आली. आम्हाला गोंदिया येथे जेलमध्ये टाकण्यात आले. दिल्ली येथे २० लाख लोकांचे अधिवेशन घेण्यात आले. आमच्या शेतकरी दिंडीच्या प्रभावामुळे केंद्राला निर्णय बदलावा लागला होता.

राजीव गांधी यांच्याकडून आबांचा मसूदा सादर...
पाणी आडवा - पाणी जिरवा, फलोत्पादन अभियानामध्ये गणपतराव देशमुख यांच्यासोबत मी काम केले. सोलापूर जिल्ह्यात १२१%  फलोत्पादन अभियान राबवले त्यामध्ये सांगोला तालुक्‍यात सर्वाधिक काम केले. पाणी सिंचनावर प्रचंड निष्ठा असलेला माणूस, महाराष्ट्राचे सभागृह पन्नास वर्षे समृद्ध करणारा व्यक्ती म्हणजे गणपतराव देशमुख. भ्रष्टाचाराची सावलीही त्यांच्यावर कधी पडली नाही. कामगार आणि शेतकरी हा त्यांचा केंद्रबिंदू. सर्वधर्मसमभाव मानून त्यांनी काम केले. सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना ते जवळ करीत. १९९० नंतर आरक्षणाचे प्रश्न निर्माण होत गेले. आपल्या जातीचा असताना आपल्या कडून लोक अपेक्षा करतात. उर्वरित लोकांना धक्का न लावता समाजातील जाणकार लोकांना त्यांनी बोलावले. धनगर समाजातील लोकांना आर्थिक निकषाप्रमाणे व गरजेप्रमाणे आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. सांगली येथे समाजाचा राज्यस्तरीय मेळावा झाला होता त्यानंतर पंतप्रधान राजीव गांधी यांना गणपतराव देशमुख यांनी दिलेला मसुदा आहे तसाच सादर केला इतकी दूरदृष्टी एक गणपतराव देशमुख यांच्याकडे होती. गणपतराव यांच्या जाण्याने राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. कवी, लेखक, साहित्यिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com