मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राज्य सरकारला पुन्हा गुगली टाकली असून विधानसभा अध्यक्षपदासाठी केव्हा निवडणूक घेणार, अशी विचारणा केली आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. याबद्दल राज्यपालांनी थेट सरकारला पत्र लिहिले आहे.
राज्यपालांच्या या पत्रावर मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यावर सरकार लवकरच प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यपालांची अशी विचारणा हे सरकारला कोंडित पकडण्यासाठी तर नाही ना, अशीही चर्चा त्यामुळे झाली आहे. राज्यपालांना उत्तराखंड येथे जाण्यासाठी सरकारने विमान नाकारल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. तेव्हाच सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षाचा मुद्दा टोकाला गेला होता. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमावयाच्या नावांना राज्यपाल मान्यता देत नसल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे. हा संघर्ष आता पुन्हा समोर आला आहे.
पटोले यांची काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिला आहे. राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एक मार्चपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड करायची की नाही याचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आधीच एक दिवसाचे तातडीचे अधिवेशन बोलवावे, असाही प्रस्ताव आहे.
वाचा ही पण बातमी : आम्ही कुत्र्यांना घाबरत नाही...
या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष यांचे पुन्हा शक्तिप्रदर्शन होऊ शकते. त्यामुळेच पटोले यांनी राजीनामा देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. या शक्तिप्रदर्शनाच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीतील आमदारांशी संपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार विभागनिहाय आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनासाठी बोलविण्यात येत आहे. त्यात ठाकरे हे सत्ताधारी आमदारांची ख्यालीखुशाली विचारत आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार की नाही, याचा निर्णय योग्य वेळी घेण्याचे भाजपने या आधीच जाहीर केले आहे. आता थेट राज्यपालांनीच विचारणा केल्याने सरकारचा याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. हे पद काॅंग्रेसकडेच राहणार आहे. मात्र त्यावर तीनही पक्षांतील नेत्यांची चर्चा अद्याप झालेली नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत, आदिवासी विकासमंत्री के. सी. पडवी आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची या पदासाठी चर्चा सुरू आहे. त्यातही मंत्री असलेले कोणी या पदावर जाण्यास फारसे उत्सुक नाही. त्यामुळे थोपटे यांच्या नावावर सहमती होऊ शकते, असे सांगण्यात आले.

