भाजप कार्यकर्त्यांचे 'गोली मारो...'चे नारे अन् त्यांना अटक करणारे IPS अधिकारी झाले कॅबिनेट मंत्री - Ex IPS Humayun Kabir gets Cabinet ministry in Mamta Banerjee government | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप कार्यकर्त्यांचे 'गोली मारो...'चे नारे अन् त्यांना अटक करणारे IPS अधिकारी झाले कॅबिनेट मंत्री

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

देबरा विधानसभा मतदारसंघात दोन निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये लढत झाली होती.

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जम्बो मंत्रीमंडळातील 43 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. या मंत्रीमंडळामध्ये ममतादीदींनी सोशल इंजिनिअरींगचे सुत्र साधल्याचे दिसते. महिला, मुस्लीमांसह नव्या-जुन्या नेत्यांचा ताळमेळ घालत त्यांनी मंत्रीमंडळाची रचना केली आहे. यामध्ये निवृत्त आयपीएस अधिकारी हुमायूँ कबीर यांच्या नावाचाही समावेश आहे. (Ex IPS Humayun Kabir gets Cabinet ministry in Mamta Banerjee government)

पश्चिम बंगालमध्ये लक्षवेधक ठरलेल्या देबरा विधानसभा मतदारसंघात दोन निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये लढत झाली होती. या लढतीत कबीर यांना विजय मिळाला आहे. त्यानंतर कबीर यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. कबीर यांच्या पत्नी आधीपासूनच तृणमुलमध्ये काम करत आहेत. त्यामुळे कबीर यांची पक्षातील वाट सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : एकीकडे मंत्र्यांना शपथ अन् लगेच CBI ला चालविण्यास राज्यपालांकडून परवानगी

कबीर हे  कोलकत्याजवळील चंदननगरचे पोलिस आयुक्त होते. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपच्या रॅलीदरम्यान 'गोली मारो'चे नारे देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी अटक केली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला. एप्रिलमध्ये ते निवृत्त होणार होते. ते याच मतदारसंघातील मूळचे रहिवासी होते. त्यांचे आईवडिल देखील देबरा येथेच अजूनही वास्तव्यास आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने माजी आयपीएस अधिकारी  भारती घोष यांना उतरवले होते. कबीर यांना 84 हजार 441 तर घोष यांना 74 हजार 733 मते मिळाली. तब्बल दहा हजार मतांच्या फरकाने कबीर यांचा विजय झाला. 

मंत्रीमंडळात माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी

मंत्रीमंडळामध्ये माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तिवारीही निवडणुकीपूर्वीच तृणमुलमध्ये दाखल झाले होते. त्याचप्रमाणे बंकिम बाजरा, रथीन घोष, पुलक रॅाय, बिप्लव मित्र, अखिल गिरी, रत्ना दे नाग आदी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 

आठ महिला अन् सात मुस्लिम मंत्री

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आठ महिलांना संधी दिली आहे. तसेच सात मुस्लिम आमदारांचाही मंत्रीमंडळात समावेश आहे. त्यामध्ये हुमायूँ कबीर यांच्यासह फिरहाद हकिम, जावेद अहमद खान, गुलाम, रब्बानी आणि सिद्दीकुल्लाह चौधरी यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख