स्पुटनिक लस आली पण पडणार महागात; कोव्हॅक्सिन अन् कोविशिल्डला टाकले मागे - Dr Reddys lab declared price of Sputnik V Vaccine in india | Politics Marathi News - Sarkarnama

स्पुटनिक लस आली पण पडणार महागात; कोव्हॅक्सिन अन् कोविशिल्डला टाकले मागे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 मे 2021

आज रेड्डीच लॅबोरेटरीजकडून लशीची किंमत जाहीर करण्यात आली आहे.

हैदराबाद : मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली रशियाची स्पुटनिक व्ही लस आज अखेर बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लशीचा पहिला डोस हैदराबादमध्ये दिल्याची घोषणा डॅा. रेड्डीज लॅबोरेटरीने केली आहे. तसेच लशीच्या एका डोसची किंमतही निश्चित करण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण या लशीसाठी सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. ही किंमत कोव्हॅक्सिन व कोविशिल्डपेक्षा अधिक आहे. (Dr Reddys lab declared price of Sputnik V Vaccine in india) 

रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापराला मागील महिन्यातच परवानगी दिली आहे. त्यामुळे या लशीला परवानगी देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. ही लस पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती कालच केंद्र सरकारने दिली आहे. देशात १ मे रोजीच या लशीचे दीड लाख डोस हैदराबाद येथे दाखल झाले आहेत. मात्र, या लशीच्या सुरक्षिततेच्या चाचण्यांना बराच कालावधी लागल्याने लस उपलब्ध होऊ शकली नव्हती.  

हेही वाचा : अमेरिकेत अच्छे दिन : लशीचे दोन्ही डोस घेतले असल्यास मास्कचे बंधन नाही

आज रेड्डीच लॅबोरेटरीजकडून लशीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार स्पुटनिक लशीचा एक डोस ९९५ रुपयांना मिळणार आहे. इतर देशांमध्ये ही लस १० डॅालर म्हणजेच सुमारे ७५० रुपयांना दिली जाते. तर सिरम इन्स्टिट्युटची लस केंद्र सरकारला केवळ दोन डॅालर म्हणजे १५० रुपयांनाच मिळते. तर नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये ही लस २५० रुपयांना दिली जाते. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येते. राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन प्रतिडोस ४०० रुपयांना मिळेल. खासगी रुग्णालयांना ही लस १ हजार २०० रुपयांना मिळेल. इतर देशांसाठी या लशीचा दर १५ ते २० डॉलर असेल, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. सिरमने राज्य सरकारांना ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, ही लस १५० रुपयांतच ही लस मिळत आहे. 

स्पुटनिक व कोविशिल्डची तुलना केल्यास किंमतीत पाचपटीने फरक आहे. दोन्ही लशींमधील किंमतीत मोठा फरक असल्याने रशियन डायरेक्ट इन्व्हेटमेंट फंड (आरडीआयएफ) कडून किंमतीत फारशी कपात केली जाणार नाही, असे दिसते. सिरमच्या बरोबरीने लशीची किंमत आणण्याची शक्यता खूप कमी आहे. काही दिवसांपूर्वी आरडआएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव म्हणाले होते की, कोविशिल्ड लशीच्या तुलनेत स्पुटनिक बाजारात खूप महाग आहे. सर्व देशांमध्ये स्पुटनिकची किंमत जवळपास सारखीच आहे. भारतासह आतापर्यंत 60 देशांनी या लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. उत्पादनाचा विचार केल्यास लशीची किंमत एवढी कमी होणे शक्य नाही. पण सरकार व खासगी बाजारातील किंमती वेगळ्या कऱण्याबाबत काही उपाय सुचविता येतील, असेही ते म्हणाले. 

स्थानिक उत्पादन सुरू झाल्यानंतर लशीची किंमत कमी होऊ शकते, असेही रेड्डीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लशीच्या उत्पादनासाठी कंपनीकडून भारतातील सहा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. येत्या महिन्यात लशीची आणखी आयात केली जाईल. भारतात उत्पादन सुरू झाल्यानंतर त्याचाही पुरवठा सुरू होईल. देशातील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. देशात कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता त्यामध्ये स्पुटनिक व्ही या लशीची भर पडणार आहे. ही भारतातील तिसरी लस ठरणार आहे. या लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर लशीचे डोस भारतात येण्यास सुरूवात झाली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख