अमेरिकेत 'अच्छे दिन' : लशीचे दोन्ही डोस घेतले असल्यास मास्कची गरज नाही - Americans who fully vaccinated no longer need to wear a mask says jo biden | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

अमेरिकेत 'अच्छे दिन' : लशीचे दोन्ही डोस घेतले असल्यास मास्कची गरज नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 मे 2021

भारतात सार्वजनिक ठिकाणी मास्कच्या सक्तीसह घरातही मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

वॅाशिंग्टन : लस घेतल्यानंतर कोरोनाचा (Covid-19) संसर्ग होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळं भारतात सार्वजनिक ठिकाणी मास्कच्या सक्तीसह घरातही मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. पण अमेरिकेने (America) तेथील नागरिकांना आता मास्कपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. लशीचे दोन्ही डोस घेतले असल्यास मास्क वापरण्याचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. लस घेतलेले नागरिक यापुढे मुक्त संचार करू शकतात, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. (Americans who fully vaccinated no longer need to wear a mask says Joe Biden )

जगात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाबाधितांसह अमेरिकेतील मृतांचा आकडाही सर्वाधिक होता. अजूनही तिथे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पण त्यासोबतच अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधात्कम लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून मास्कसह इतर निर्बंध कमी करण्याची मागणी केली जात होती. आतापर्यंत अमेरिकेतील ११ कोटींहून अधिक नागरिकांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के एवढी आहे. त्यामुळे अमेरिकेत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मास्कचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. 

हेही वाचा : Maratha Reservation : केंद्र सरकारचे 'देर आये दुरुस्त आये'...आता ५० टक्के मर्यादेचे बघा!

अमेरिकेतील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राच्या (CDC) अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना लशींच्या प्रभावाबाबत जगभरातील आकडे सकारात्मक असून लसीकरणानंतर महामारीपासून लोक सुरक्षित होत आहेत. कोरोनाच्या नवीन प्रकारांवरही लस प्रभावी ठरत असून लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण नगण्य आहे. पण महामारीने आणखी उग्र स्वरूप धारण केल्यास निर्बंध पुन्हा कडक होऊ शकतात, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. 

मास्क वापरण्यापासून देण्यात आलेली सुट विमान प्रवासी तसेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. तसेच काही व्यवसायांतील लोकांनाही मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. मागील आठ महिन्यांत अमेरिकेतील नवीन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. जानेवारी महिन्यात दररोज ३ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. आता हा आकडा ६०० पर्यंत खाली आला आहे.

दरम्यान, भारतात आतापर्यंत जवळपास १८ कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मात्र, तुलनेने लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण खुप कमी आहे. तसेच अजूनही देशात दररोज जवळपास साडे तीन लाख नवीन रुग्ण आढळून येत असून दररोज तीन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख