पुन्हा राजकीय संकट...काँग्रेसच्या 18 आमदारांचा सरकारला अल्टिमेटम

मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते.
पुन्हा राजकीय संकट...काँग्रेसच्या 18 आमदारांचा सरकारला अल्टिमेटम
Dispute in CM Ashok gehlot and Sachin pilot rises in rajasthan

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्याविरोधात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद आता चांगला पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. (Dispute in CM Ashok gehlot and Sachin pilot rises in Rajasthan)

मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करुन समजूत काढल्याने पायलट आणि त्यांचे 18 बंडखोर पक्षात परतले होते. त्यापैकी हेमाराम चौधरी यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी गेहलोत व पायलट यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे संकेत मिळाले होते. पायलट यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न असल्याचे समजते.

आता मागील काही दिवसांपासून पायलट समर्थकांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. काही बैठका पायलट यांच्या निवासस्थानी घेण्यात आल्या आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्तारात या आमदारांना संधी देण्यासह पायलट यांच्याबाबत काही प्रमुख मागण्याही मागील वर्षी करण्यात आल्या होत्या. पण अद्याप त्यातील एकही मागणी पूर्ण झालेली नाही. पायलट यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

पायलट यांनी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केल्याचे समजते. तसेच समर्थक आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियांका गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. तोपर्यंत पुन्हा हे आमदार बंड करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आमदारांनी जुलै महिन्यापर्यंत श्रेष्ठींना अल्टीमेटम दिला जाऊ शकतो. त्यानंतर पायलट व हे आमदार पक्षात राहण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

पायलट काही आहेत नाराज?

पायलट यांनी माघार घेताना पक्षाकडे काही मागण्या केल्या होत्या. यातील पहिली मागणी होती, पुढील 2023 च्या विधानसभा निवडणुकीआधी पक्षाने त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. दुसरी मागणी होती की, त्यांच्या समर्थक आमदारांना चांगली खाती देणे आणि तिसरी मागणी होती की काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांना हटविणे. 

यातील पहिली मागणी मागील वर्षीच मान्य करुन पक्षाने पांडे यांना प्रभारी पदावरुन हटवले होते. परंतु, इतर दोन मागण्या अद्याप पक्षाने मान्य केलेल्या नाहीत. पायलट यांच्या समर्थकांना मंत्रिपदे तसेच, पक्ष संघटनेत पदे देण्यात आलेली नाहीत. याबाबत चौधरी हे वारंवार उघडपणे आवाज उठवत होते. काही आमदारांनी तर विधानसभेतही या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारला लक्ष्य केले होते. 

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in