धक्कादायक : संत्र्याच्या बागेत कोरोना रुग्णांवर होतायेत उपचार - Covid-19 Rural Peoples are taking treatments in Orange orchard | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : संत्र्याच्या बागेत कोरोना रुग्णांवर होतायेत उपचार

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 मे 2021

देशातील अनेक राज्यांतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना (Covid19) रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लागला आहे. रुग्णांना रुग्णालयांमध्ये (Covid Hospitls) बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांना रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात चक्क संत्र्याच्या बागेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थानिक बोगस डॅाक्टरांकडून हे उपचार केले जात आहेत. (Covid-19 Rural Peoples are taking treatments in Orange orchard)

देशातील अनेक राज्यांतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. रुग्णांना बेड मिळत नसल्याने अनेकांना नाईलाजास्तव घरीच उपचार घ्यावे लागत आहेत. उपचार मिळण्यासाठी रुग्णांना रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. मध्य प्रदेशमध्येही भयावह स्थिती आहे. राज्यातील धान्याकेडी या गावात रुग्णांवर संत्र्याच्या बागेत उपचार केले जात आहेत. राज्याची राजधानी असलेल्या भोपाळपासून 200 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

हेही वाचा : असेही राजकारण : कोरोना बेड घोटाळ्याला भाजप नेत्यांकडून धार्मिक रंग

संत्र्याच्या बागेत झाडांना सलाईनच्या बाटल्या अडकवून उपचार केले जात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, खासगी ड्राक्टरांकडून ही अजब व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना झाडाखालीच झोपवले जात आहे. आश्चर्य म्हणजे जवळपासच्या दहा गावांतील रुग्ण याठिकाणी येऊन उपचार करत आहेत. या रुग्णांना कोरोनाची कसलीही भीती दिसत नाही. मास्क किंवा सुरक्षित अंतराबाबतही ते अनभिज्ञ आहेत. 

सरकारी रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेलो तर तिथेच कोरोना वॅार्डमध्ये राहावे लागेल, अशी भीती येथील रुग्णांनी व्यक्त केली. या भीतीचा गैरफायदा घेऊन ग्रामीण भागातील बोगस डॅाक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहे. लोकही अशा ठिकाणी येऊन आपला जीव धोक्यात घालत असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, देशात मागील 24 तासांत आतापर्यंतचे दैनंदिन सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात 4 लाख 12 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर जवळपास चार हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 900 हून अधिक मृत्यू एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या तुलनेने कमी होऊ लागली आहे.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख