अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलावं.... आम्ही बोललो तर महाग पडेल : चंद्रकांतदादांचा थेट इशारा - Chandrakant Patil warns Ajit Pawar to control his tounge | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलावं.... आम्ही बोललो तर महाग पडेल : चंद्रकांतदादांचा थेट इशारा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 30 मे 2021

महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार यावरून दोघांत रंगलाय वाद 

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. (Chandrakant Patil criticizes Ajit Pawar) तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शांत राहण्याच्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला आहे. मराठा आरक्षणासाठी  शरद पवार आणि अजित पवार यांनी संघर्ष केल्यास आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणावर संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, “मराठा आरक्षण लगेच मिळण्यासाठी, मराठा आरक्षण मिळेपर्यंत सवलती मिळवण्यासाठी जो कोणी संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत…पण संघर्ष न करता, कोविड संपल्यावर मिळालं पाहिजे असं ते म्हणाले असून आम्हाला ते मान्य नाही. कोविडचा काय संबंध? सगळं जनजीवन सुरु आहे, भ्रष्टाचार सुरु आहे. मग मराठा समाजाने कोविडचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत थांबायचं का?,” अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ही बातमी वाचा : अजित पवारांनी मागणी केली आणि मोदी सरकारने ही पावले उचलली...

सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं,’ असे विधान पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबद्दल बोलताना केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खोचक उत्तर दिले होते. या उत्तरावर पाटील यांनी आक्रमक प्रत्युत्तर “ज्या भाजपासोबत आपण तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे,”

“अजित पवार यांनी भाजपबद्दल टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही,” असा टोला पाटील यांनी अजित पवारांना लगावला.

“अजित पवारांना कुणीही तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलेलं नव्हतं. त्यामुळे आपण ज्या भाजपासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान त्यांनी बाळगायला हवे. तुम्हाला राष्ट्रवादीचे २८ आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे. अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती आहे,” अशी टीका पाटील यांनी केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख