पत्नी रुग्णालयात जमिनीवर झोपून...बेडसाठी आमदार हतबल; जिल्हाधिकाऱ्यांच्या फोनवर झालं काम - BJP Mla Pappu Lodhi criticised Yogi government over covid situation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

पत्नी रुग्णालयात जमिनीवर झोपून...बेडसाठी आमदार हतबल; जिल्हाधिकाऱ्यांच्या फोनवर झालं काम

वृत्तसंस्था
रविवार, 9 मे 2021

रुग्णांना बेड मिळणंही कठीण झाले आहे. रुग्णालयांबाहेरच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणंही कठीण झाले आहे. रुग्णालयांबाहेरच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याचा फटका आमदार, खासदारांनाही बसल्याचे समोर आले आहे. बेड मिळवताना त्यांचीही दमछाक होत असल्याची स्थिती उत्तर प्रदेशात आहे. (BJP Mla Pappu Lodhi criticised Yogi government over covid situation)

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जनपद येथील जसरानाचे आमदार रामगोपाल उर्फ पप्पू लोधी यांना पत्नीसाठी बेड मिळवताना असाच अनुभव आला. आमदार लोधी व त्यांच्या पत्नीला ३० एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. सुरूवातीला त्यांना फिरोजाबाद येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. आमदार लोधी यांना तब्येत सुधारल्यानंतर शनिवारी घरी सोडण्यात आले. मात्र, त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॅालेजमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले. 

हेही वाचा : कोरोनाला रोखण्याऐवजी ते ट्विटवर व्यस्त होते;लॅन्सेटने मोदी सरकारला झोडपलं

पप्पू लोधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथील रुग्णालयात पत्नीला लवकर बेड मिळाला नाही. तीन तास जमिनीवरच झोपून राहावे लागले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. त्यांनी प्रयत्न केल्यानंतर एक बेड उपलब्ध झाला. पण आता बेड मिळूनही पत्नीच्या प्रकृतीबाबत कुणीच काही माहिती देत नाही. रुग्णालयात चांगले उपचार मिळत नाहीत. पत्नीला पाणी-जेवण दिले जात नाही. अधिकारी आणि डॅाक्टर काहीच करत नाहीत,  असे लोधी यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यात सर्व सुविधा उपलब्ध असून रुग्णांना बेड मिळण्यासाठी अडचणी येत नसल्याचा दावा केला जात आहे. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच पक्षातील मंत्री, आमदार, खासदार आता उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे योगींच्याही अडचणी वाढू लागल्या आहेत. आमदार, खासदारांना बेड मिळत नाहीत, अधिकारीही त्यांना दात देत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उत्तर प्रदेशाला मोठा फटका बसला आहे. लखनऊ, कानपुर या शहरांमधील स्थिती भयावह आहे. मागील २४ तासांत उत्तर प्रदेशात जवळपास २७ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. लखनऊमध्ये सर्वाधिक २ हजार १७९ रुग्ण आहेत. जवळपास अडीच लाख रुग्ण सध्या उपचार गेत आहेत. तर २४ तासात सुमारे ३०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख