कोरोनाला रोखण्याऐवजी ते ट्विटरवर व्यस्त होते; 'लॅन्सेट'ने मोदी सरकारला झोडपलं - Lancet journal criticised modi government over rise of covid19 cases | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाला रोखण्याऐवजी ते ट्विटरवर व्यस्त होते; 'लॅन्सेट'ने मोदी सरकारला झोडपलं

वृत्तसंस्था
रविवार, 9 मे 2021

भारतात एक अॅागस्टपर्यंत १० लाख लोकं मृत्यूमुखी पडतील, असा अंदाज वर्तवल्याचा उल्लेख लॅन्सेटमध्ये करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वाढता कहर जगाच्या चिंतेचा मुद्दा बनला आहे. जगभरातील तज्ज्ञांनी भारतातील कोरोना विस्फोटामागे येथील निष्काळजीपणाला दोष दिला आहे. 'लॅन्सेट' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय संशोधन नियतकालिकाने थेट मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कोरोनाच्या महामारीला नियंत्रणात आणण्याऐवजी ट्विटरवर होणाऱ्या टीकाकारांना रोखण्यात व्यस्त होते, अशी टीका 'लॅन्सेट'मध्ये करण्यात आली आहे. 

लॅन्सेटमध्ये भारतातील कोरोना महामारीचा लेखाजोखा प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये थेट मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली आहे. भारतात दररोज सरासरी ३ लाख ७८ नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर ४ मेपर्यंत २ लाख २२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये जागा नसून कर्मचाऱ्यांवरील ताण प्रचंड वाढला आहे. भारतात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्ष वर्धन यांनी महामारी संपत असल्याची घोषणा केली. दुसरी लाट आणि कोरोनाच्या नवीन प्रकारांचा धोका लक्षात घेतला नाही. भारतात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचा चुकीचा दावा करण्यात आला, असे 'लॅन्सेट'मध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : काँग्रेसने डावललं अन् भाजपने हेरलं; आज मुख्यंमत्रीपदाची माळ गळ्यात

सरकारला सुपरस्प्रेडर कार्यक्रमांबाबत इशारा देऊनही धार्मिक उत्सवांना परवानगी देण्यात आली. देशभरातून लाखो लोक एकत्र आले. मोठ्या राजकीय सभा झाल्या. त्यामध्ये कोरोनाचे नियम पाळण्यात आले नाहीत. पहिल्या लाटेत कोरोनावर नियंत्रण मिळाल्यानंतर टास्क फोर्सची बैठक झाली नाही. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. सरकारने आपल्या चुका मान्य नवीन धोरणं राबवायला हवीत, असेही 'लॅन्सेट'ने नमूद केलं आहे.

'लॅन्सेट'कडून सरकारच्या कोरोना लसीकरण धोरमावरही टीका केली आहे. सरकार केंद्रीय स्तरावर ही मोहिम राबवण्यात अपयशी ठरलं आहे. अठरा वर्षांवरील लोकांना लस देण्याबाबत राज्य सरकारांशी चर्चा झाली नाही. लसीकरणाची व्याप्ती वाढवताना अचानक धोरणांत बदल केला गेला. परिणामी, लशीचा तुटवडा निर्माण होऊन गोंधळ उडाला, अशी टीका 'लॅन्सेट'मधून करण्यात आली आहे.

भारताने दोन मुद्यांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढविणे आणि कोणत्याही परिस्थतीत संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरकारने कोरोनाविषयीची सर्व माहिती पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोहचवायला हवी. जिनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष केंद्रीत करायला हवे, असेही 'लॅन्सेट'ने सुचविले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर अॅाक्सीजन, बेड तुटवड्याची माहिती टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचाही संदर्भ 'लॅन्सेट'मध्ये देण्यात आला आहे. 

दि इन्स्टिट्युट फॅार हेल्थ मेट्रिक्स अॅन्ड इव्हॅल्युएशनने भारतात एक अॅागस्टपर्यंत १० लाख लोकं मृत्यूमुखी पडतील, असा अंदाज वर्तवल्याचा उल्लेख लॅन्सेटमध्ये करण्यात आला आहे. हे घडले तर त्याला मोदी सरकारच जबाबदारी असेल, असेही लॅन्सेटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख