पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना; तर्कवितर्कांना उधाण  

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत.
Pankaja Munde .jpg
Pankaja Munde .jpg

मुंबई: बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना न मिळालेले मंत्रीपद, त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत केलेला खुलासा आणि त्यानंतर मुंडे समर्थकांनी दिलेले राजीनामे या पार्श्वभूमीवर पंकजा दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्लीत पंकजा मुंडे पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (BJP leader Pankaja Munde leaves for Delhi) 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपमधील मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर (ता. १० जुलै) बीडमधील १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. विस्ताराच्या दिवशीही मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.  

दरम्यान, शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सविता रामदास बडे, तर प्रकाश खेडेकर यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांसह १४ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवून दिले आहेत. प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपने मुंडे भगिनींवर अन्याय केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंडे यांच्यावर अन्याय केला जात असून यापुढे तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही समर्थकांनी दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ७ जुलै रोजी झाला. त्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. सुरुवातीला आघाडीवर असलेले मुंडे यांचे नाव विस्ताराच्या दिवशी मागे पडले आणि प्रीतम यांची केंद्रीय मंत्री होण्याची संधी हुकली. मुंडे यांच्याऐवजी खासदार भागवत कराड यांना संधी देण्यात आली. त्यामुळे समर्थकांकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com