आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही : कॉंग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका - Congress OBC cell state president Bhanudas Mali's criticism of Sharad Pawar and Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही : कॉंग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 जुलै 2021

कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून त्यांची घुसमट होत आहे.

सोलापूर : राज्यात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र, कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली मंत्रिपदे आणि मिळणारा निधी अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच कमी आहे. कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून त्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस स्वबळावरच लढेल, असे कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी स्पष्ट केले. (Congress OBC cell state president Bhanudas Mali's criticism of Sharad Pawar and Ajit Pawar)

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरताच पक्ष असून कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही आहोत, अशी कडवट टीकाही भानुदास माळी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. 

हेही वाचा : आमदार अशोक पवारांनी बाजी मारत सभापतिपद नेले ‘शिरूर-हवेली’त

सोलापुरात आज (ता.10 जुलै) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसची होणारी घुसमट आणि सापत्न वागणुकीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांची भूमिका पटवून दिली आहे. राज्यात स्वबळावर निवडणूका लढविण्यास पक्षश्रेष्ठींकडून होकार मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनांनुसारच मी राज्यभर ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करीत आहे. आतापर्यंत 21 जिल्ह्यांमध्ये दौरे केले असून, आगामी काळात तालुका स्तरावरील संघटन मजबूत करण्याचे नियोजन आहे, असेही ते म्हणाले.

फडवीसांनी आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न केले

आमच्या सरकारने  2009 ते 2013 या काळात सामाजिक सर्वेक्षण करून इम्पिरियल डाटा तयार केला. तोच, डाटा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. परंतु, तत्कालीन फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये; म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आरक्षणमुक्त भारत करण्याचा डाव 'आरएसएस'च्या माध्यमातून भाजपने आखल्याचेही माळी म्हणाले. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण न भेटल्यास त्यांना पक्षांतर्गत आरक्षण देऊन निवडणुकीत संधी दिली जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षपदावर कॉंग्रेसचाच हक्क  

ओबीसी समाजाच्या अडीअडचणी राज्य व केंद्र स्तरावर ठामपणे मांडून प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूप कष्ट केले आहेत. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना निश्‍चितपणे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसकडून मंत्रिपद मिळेल, असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, विधानसभेचे अध्यक्षपद हे कॉंग्रेसचे असून त्यावर कोणीही हक्‍क सांगू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना फटकारले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख