आमदार अशोक पवारांनी बाजी मारत सभापतिपद नेले ‘शिरूर-हवेली’त

भाजपच्या दोघांसह सर्व 18 संचालक या वेळी उपस्थित होते.
Adv. Vasantrao Korekar Unopposed elected as Chairman of Shirur Bazar Samiti
Adv. Vasantrao Korekar Unopposed elected as Chairman of Shirur Bazar Samiti

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे आज (ता. १० जुलै) ॲड. वसंतराव कोरेकर यांची बिनविरोध निवड झाली. शिरूर-हवेली व शिरूर - आंबेगाव या विभागीय नियमानुसार गतवेळी आंबेगाव भागात हे पद गेल्याने यंदा ते शिरूर-हवेलीकडे जाणार अशी चर्चा होती, ती खरी ठरली. दरम्यान या दोन मतदारसंघातील रस्सीखेचमध्ये शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आपल्या मतदारसंघात सभापती खेचून ॲड. कोरेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला संधी दिली आहे. (Adv. Vasantrao Korekar Unopposed elected as Chairman of Shirur Bazar Samiti)
 
शंकर जांभळकर यांनी वर्षभर कामकाज पाहिल्यानंतर इतरांना संधी मिळावी या उद्देशाने ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती निवडीसाठी आज सकाळी, शिरूर बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन केले होते. भाजपच्या दोघांसह सर्व 18 संचालक या वेळी उपस्थित होते. 

दरम्यान, सभापतिपदासाठी ॲड. कोरेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शंकर शि. कुंभार यांनी जाहीर केले. त्यानंतर संचालक मंडळाने ॲड. कोरेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव केला. ॲड. कोरेकर हे बाजार समितीच्या सभागृहातील वयाने सर्वांत ज्येष्ठ संचालक असून, ते बाजार समितीच्या निवडणुकीत कृषी सोसायटी मतदार संघातून विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. 

या निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते नवनिर्वाचीत सभापती ऍड. वसंतराव कोरेकर यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

आमदार ऍड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, आंबेगाव मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार व राजेंद्र जगदाळे पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर, शहर अध्यक्ष रंजन झांबरे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष विद्याताई भुजबळ, शहर अध्यक्षा पल्लवी शहा, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, शहर अध्यक्षा तज्ञिका कर्डिले, राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ऍड. प्रदीप बारवकर, शहर अध्यक्ष ऍड. रवींद्र खांडरे आदी यावेळी उपस्थित होते. 

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बाजार समितीचे मावळते सभापती शंकर जांभळकर यांनी आभार मानले. 

अजित पवार, वळसे पाटलांचा हिरवा कंदील 

बाजार समितीच्या सभापतिपदावरून राष्ट्रवादी अंतर्गत मोठी रस्सीखेच निर्माण झाल्याने व त्यातच आंबेगाव मतदार संघाला जोडलेल्या 39 गावांची विभागीय अस्मिता जागी झाल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गारटकर, आमदार पवार, माजी आमदार गावडे यांनी ही ‘तीव्रता' लक्षात घेऊन आज सकाळीच सर्व संचालकांना राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात पाचारण केले. तेथे स्वतंत्रपणे प्रत्येकाची मते जाणून घेतली.

ॲड. कोरेकर यांच्यासह आबाराजे मांढरे व विश्‍वास ढमढेरे हे देखील सभापतिपदासाठी तीव्र इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या स्वतंत्ररीत्या मुलाखतीही घेतल्या. मात्र, ज्येष्ठत्वाचा निकष लावून ॲड. कोरेकर यांच्या गळ्यात अखेर सभापतिपदाची माळ घालण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असल्याचे गारटकर यांनी स्पष्ट केले. 


विकासाचा गाडा पळता ठेवावा : आमदार पवार  

शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदावरून काम करताना शशिकांत दसगुडे व शंकर जांभळकर यांनी अनेक रचनात्मक व भरीव विकासकामांतून बाजार समितीचा लौकिक वाढवला आहे. भविष्यात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा, तळेगाव उपबाजारात व्यापारी संकुल अशा मोठ्या योजना विचाराधीन आहेत. बाजार समिती नावारूपाला आली असताना, ज्येष्ठत्वाच्या नात्याने ॲड.  वसंतराव कोरेकर यांना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी सभापतिपदाची संधी दिली. त्यांनी ज्येष्ठत्वाचा अनुभव वापरून हा विकासाचा गाडा पळता ठेवावा, अशी अपेक्षा शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com