ए भाई, तू माझ्यावर बोट उचलायचं न्हाय! अमृताताईंचा काँग्रेस नेत्याला इशारा - Amruta Fadanvis slams congress leader bhai jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

ए भाई, तू माझ्यावर बोट उचलायचं न्हाय! अमृताताईंचा काँग्रेस नेत्याला इशारा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्य सरकारला सातत्याने घेरले जात आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अनेकदा विविध मुद्यांवरून विरोधकांवर टीका करतात. ट्विटरवर त्या सतत अॅक्टिव असतात. आता त्यांनी काँग्रेस नेत्याला थेट इशारा दिला आहे. ''ए भाई, तू जो कोण असशील - माझ्यावर बोट उचलायचं न्हाय,'' अशा भाषेत त्यांनी या नेत्यावर टीका केली आहे. 

काँग्रेसचे हे नेते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आहेत. भाई जगताप यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून जगताप म्हणाले होते की, सत्तेत असताना राज्यातील पोलिसांच्या बँक खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली?, असा सवाल जगताप यांनी केला होता. 

हेही वाचा : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक

जगताप यांच्या या टीकेला उत्तर देताना अमृता फडणवीस चांगल्याच भडकल्या. ट्विटरवर त्यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख करून थेट इशारा दिला. ''ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचे न्हाय!", अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. 

दरम्यान, फडणवीस यांच्याकडून राज्य सरकारला सातत्याने घेरले जात आहे. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर त्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्य सरकारवर ते सतत टीकास्त्र सोडत असून प्रत्येक मुद्यावरून कोंडीत पकडताना दिसत आहेत. त्यावरूनच काल भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अनेक प्रकरणे दाबल्याचा आरोप त्यांनी केला होता.

फडणवीस यांनी एका दिवसांत पाच जणांना क्लीनचीट दिली होती. आता त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. सुमारे २५ प्रकरणे बाहेर आणली तरी फडणवीस सरकारने सर्वांना क्लीन चिट दिली. मुंबईतील सिडको जमिनीच्या घोटाळ्यात अडीच हजार कोटींच जमीन केवळ तीन कोटीत विकण्यात आली. यामध्ये असणारे अनेक दलाल सध्या त्यांच्या पक्षात पदाधिकारी आहेत. मंत्रालयात उंदीर मारण्याचा घोटाळाही फडणवीस यांच्या काळात झाला होता. प्रत्येक मिनिटाला ३२ उंदीर मारल्याच्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या, अशी टीका जगताप यांनी केली होती. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख