दिलासादायक : लस घेतलेल्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण शुन्य - After vaccination No deaths among those reinfected with Covid19 | Politics Marathi News - Sarkarnama

दिलासादायक : लस घेतलेल्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण शुन्य

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 जून 2021

दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने एप्रिल  व मे महिन्यात हा अभ्यास केला आहे.

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात प्रतिबंधात्मक लसीकरणावर जोर दिला जात आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. आणखी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. लसीकरण झालेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांचे मृत्यूचे प्रमाण शुन्य असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. 

दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने एप्रिल  व मे महिन्यात हा अभ्यास केला आहे. लसीकरणानंतर कोरोना झालेल्या रुग्णांबाबत पहिल्यांदाच असा अभ्यास करण्यात आला आहे. अमेरिकेतील सेंटर फॅार डिसिज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेन्शन (CDC) नेही काही दिवसांपूर्वी असाच दावा केला होता. 'लसीकरण पूर्ण झालेले लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांची प्रतिकारशक्ती कमी होण्याचे, रुग्णालयात भरती करण्याचे किंवा त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य असू शकते,' असे CDC म्हटलं आहे.

हेही वाचा : सावधान : एकट्या ससुन रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे 200 रुग्ण

AIIMS च्या अभ्यासात काय आढळले?

AIIMS मध्ये एप्रिल व मे महिन्यात हा अभ्यास करण्यात आला आहे. लसीकरण झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. काही रुग्णांमधील व्हायरल लोड अधिक होता. यामध्ये 63 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यामधील 36 रुग्णांनी लशीचे दोन डोस घेतले होते. तर 27 रुग्णांना एक डोस मिळाला होता. दहा रुग्णांनी कोविशिल्ड तर 53 रुग्णांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती.

एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला नाही. बहुतेक रुग्णांना पाच ते सात दिवसांपर्यंत तापही होता. या रुग्णांचे सरासरी वय 37 एवढे होते. सर्व रुग्ण 21 ते 92 या वयोगटातील होते. त्यामध्ये 41 पुरूष होते. एकाही रुग्णांना अन्य कोणताही आजार नव्हता. एक किंवा दोन लस घेतलेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये फारशी तफावत आढळून आली नाही.  

22 कोटींहून अधिक डोस दिले

दरम्यान, देशात आतापर्यंत 22 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. राज्यांकडे सध्या 1 कोटी 93 लाख डोस उपलब्ध आहेत. लशींचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. देशात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुटनिक व्ही या लशी उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्पुटनिक व्ही या लशीचे आयात करावी लागत असल्याने या लशीचे प्रमाण अल्प आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख