Bhagirath Bhalke, smadhan Avtade11.jpg
Bhagirath Bhalke, smadhan Avtade11.jpg

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' कुणाचा? 

महाविकास आघाडी आणि भाजपने कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करून 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा इशारा देत या मतदारसंघात स्थानिक मूलभूत गरजांना बगल देत राजकीय उणे धुणे काढून प्रचाराचे राळ उठवली

ब्रह्मपुरी : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाने राज्याच्या सध्याच्या राजकारणावर फार मोठा परिणाम होण्याची  शक्यता नसली तरीही या प्रचारात भारतीय जनता पक्षाचे नेते ही जागा निवडून द्या राज्यातील पुढील करेक्ट कार्यक्रम मी करतो असे ठामपणे जाहीर सभेत बोलले. महाविकास आघाडी आणि भाजपने कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करून 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा इशारा देत या मतदारसंघात स्थानिक मूलभूत गरजांना बगल देत राजकीय उणे धुणे काढून प्रचाराचे राळ उठवली, ते पाहता राजकीय इर्ष्या टोकाला गेल्याचा  पुरावा ह्या पोट निवडणुकीत दिसून आला.

सध्या कोरोना संसर्गाने राज्याला विळखा घातला आहे. रोज राज्यात पन्नास ते साठ हजारांवर कोरोनाबाधित आढळत आहेत. मृत्यूचा आकडादेखील वाढत आहे. यामुळे राज्यातील सरकार, विरोधक, नेते आणि जनताही चिंताक्रांत झाली आहे. आरोग्ययंत्रणा तोकड्या कर्मचऱ्याअभावी कोलमडून पडली आहे. तसेच महसूल व पोलिस प्रशासनास वाढत्या कोरोना संसर्गा बरोबर ह्या पोटनिवडणुकीत अधिक कामाचा ताण होता. दिवस रात्र आपले कर्तव्य त्यांना बजवावे लागेल. 

राज्यात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी जाहीर केली. परंतु ह्या पोट निवडणुकीत विविध पक्षाच्या सभेला जत्रेचे स्वरूप आले होते. हे सारे एकीकडे चित्र असताना पंढरपूर- मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळेच वातावरण निर्माण झाले. कोरोनाचासंसर्गाचा आणि या मतदारसंघाचा जणू काहीच संबंध नाही, या पद्धतीने या भागात पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडवला गेला.

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात आमदार भारत भालके यांनी 2019 वर्षी हॅट्रिक केली. रिडलोस, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा पंधरा वर्षातील तीन पक्षात प्रवास करून तालुक्यातील विविध विकास कामे करत सामान्य जनतेच्या जोरावर मातब्बर उमेदवारास पराभव करून राज्यात जॉईंट किलर बनले व तिसऱ्यांदा आमदार झाले. पण, कोरोनावर मात केल्यानंतरही त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही. काही महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले, आणि या विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. 

राजकीय परंपरेप्रमाणे त्यांचे वारसदार भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीची असली तरी नव्या, समीकरणाप्रमाणे त्यांना पाठिंबा मात्र महाविकास आघाडीचा मिळाला. त्यांच्या विरोधात भाजपने साखर सम्राट व उध्योगपती असलेल्या समाधान आवताडे या ताकदीच्या उमेदवारास मैदानात उतरवले. खरी लढत भालके आणि आवताडे अशी असली तरी त्याला अनेक छुपे कांगोरे अधिक होते. तसेच या निवडणुकीत छुपे राजकारण अधिक गाजले.

मतदारसंघाचा नवा आमदार ठरविण्यासाठी ऐन कडक उन्हाळ्यात शनिवारी रोजी चुरशीने ६६.२० टक्के मतदान  झाले. उन्हाळ्यात वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर बसणार हे मतपेटीतून दिसून येणार आहे. प्रचाराचा धुरळा गुरुवारीच खाली बसला. खर तर ही एका विधानसभेची पोटनिवडणूक, पण जणू या निकालाने राज्याचे राजकारणच बदलणार आहे, या पद्धतीने पंधरा दिवस प्रचाराचे रान उठविण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे, काँग्रेस नेते नाना पटोले ,आमदार रोहित पवार, आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यासह अनेकांनी पंढरपूर-मंगळवेढा पिंजून काढले.

 त्याला प्रत्त्यूतर देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेकांनी गल्लीबोळातील पायऱ्या झिजवल्या. ‘तुम्ही विजयी कौल द्या, आम्ही राज्यात करेक्ट कार्यक्रम करतो’ असे सांगून राज्याच्या राजकारणात ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीबाजूने झाला. मतदारसंघातील प्रश्नापेक्षा राज्य आणि केंद्रावर टीका करून लोकांची करमणूक केली. यामुळे मतदारसंघातील प्रश्न अनुत्तरितच राहीले.

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मंगळवेढामार्गे प्रस्तावित असलेला पंढरपूर ते विजापूर रेल्वेमार्ग, बसवेश्वरांचे नियोजित स्मारक, या भागातील ज्वारीला राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न या निवडणुकीत कुठेच चर्चेत आला नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, चिखलफेक करण्यापलिकडे प्रचाराची गाडी पुढे गेली नाही. शेतकऱ्यांची एफआरपी बुडविणाऱ्या कारखान्यांवर स्वाभिमानी पक्ष व्यतिरिक्त इतर पक्षाची फारशी टीका झालीच नाही. मतदारसंघातील प्रश्नापेक्षा राज्याचे राजकारण महत्त्वाचे आहे. हेच या निवडणुकीत मतदारांना ठासून सांगण्याचा अधिक प्रयत्त झाला. 

स्व भालके यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत भगीरथ भालके यांनी प्रचारात आघाडी घेतली, तरीही त्यांना मतविभागणीची भीती आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेने केलेल्या बंडखोरीचा त्यांना त्रास होणार आहे. पण, भाजपने आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत रणनीती आखात उमेदवार समाधान आवताडे रणनीती यांचे कुठे तरी समाधान होण्यासारखे परिस्थिती असताना त्यांच्या घरातील अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. 

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत औताडे यांच्यामुळेच प्रशांत परिचारकांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ते आता त्यांना किती मनापासून मदत करणार? पंढरपूरकराना मंगळवेढ्याचा भूमिपुत्र चालणार का हा मोठा प्रश्न आहे. सध्याची परिस्थिती मंगळवेढा तालुक्यात दोन्हीही उमेद्वाराची काट्याची टक्कर असून अपक्ष उमेदवाराचा फटका कोनास बसतो हे पाहणे महत्वाचे आहे. मागील निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात आवताडेंची मोठ्या प्रमाणात मतदानाचा फटका बसला होता. ह्यावेळी मात्र दोन्हीही उमेदवारास विजयाची मदार पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील मतदानावर असून कोणी किती ताकद लावली? येणारा मतदानरूपी कळणार आहे. पण आवताडे याना पंढरपुरात दोन निवडणुकीत फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

या वेळी काय होणार यावरच निकाल अवलंबून राहणार आहे. दोन्ही उमेदवार हे साखर सम्राट आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. या प्रश्नावर स्वाभिमानी संघटनेचा उमेदवार या निवडणुकीत उतरला असला तरी तो फक्त कुणाची किती मते खाणार एवढीच उत्सुकता आहे. कोणत्याही पोटनिवडणुकीत सहानुभूतीची लाटच विजयाकडे जाण्यास मदत करत असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत स्व. भारत भालके यांची सहानुभूतीची लाट श्रेष्ठ ठरणार की भाजपची ताकद हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com