भालके, आवताडे यांनी निवडणुकीनंतरही जपले कार्यकर्त्यांशी नाते  - Bhalke, Avtade offered condolences to the families of the deceased activists in Pandharpur constituency | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

भालके, आवताडे यांनी निवडणुकीनंतरही जपले कार्यकर्त्यांशी नाते 

हुकूम मुलाणी
रविवार, 18 एप्रिल 2021

मतदानानंतर सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आजतागायत मतदारसंघात होते.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर मतदारसंघातील गावोगावचे कार्यकर्ते मताधिक्यावर चर्चा करत आहेत. मात्र,  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे हे दोघेही रविवारी (ता. १८ एप्रिल) मतदारसंघातील मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी घराबाहेर पडले होते.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आपापल्या वरिष्ठ  नेत्यांना प्रचारासाठी आणत विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली आहे. आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा, यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनीदेखील गेल्या महिनाभरापासून मतदान होईपर्यंत जीवाचे रान केले. कोरोनाच्या संकटातदेखील मतदान केंद्रावर (इतर निवडणुकीत मतदारांना ने आण करण्याकरता उमेदवाराकडून वाहनांची सोय केली जाते. पण, यावेळी मात्र मतदार स्वतःहून घराबाहेर पडून मतदानासाठी उपस्थिती लावली.) स्वतःहून गर्दी केली होती. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमधून जवळपास 65.83 टक्के इतके मतदान झाले. त्यामध्ये एक लाख 20 हजार 885 पुरुषांनी, तर 1 लाख 3 हजार 514 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान झाल्यानंतर आज दिवसभर सोशल मीडियातून गुलाल आपलाच, तयारी दोन मे रोजीची व याशिवाय काही स्थानिक वाहिन्यांचे एक्झिट पोल टाकून आनंदोत्सव साजरा करत असल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. असे असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे हे मतदारसंघातील पाटकळ येथील निधन झालेले कार्यकर्ते चव्हाण कुटुंबीयांना भेटण्यासाठी व्यस्त होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हेदेखील नुकतेच बोराळे येथील निधन झालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब पाटील यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बोराळे ते आले होते. 
 
कार्यकर्ते आपापल्या नेत्याला आपल्या गावात किती मतदान झाले. तालुक्यात किती व मतदारसंघात किती मतांनी येणार, याची माहिती देत आणि घेत होते. गावोगावच्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून विजयाच्या पैजा लावल्या जात आहेत. या सर्व चर्चांमध्ये उमेदवारांनी मात्र निधन झालेले कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ दिला. मतदानानंतर सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आजतागायत मतदारसंघात होते. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी या गोष्टीला छेद दिल्याचे चर्चा मतदारसंघात सुरू होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख