मराठी भाषकांचा गड ढासळला! बेळगावातील 37 वर्षांची सत्ता गेली...

भाजपच्या नगरसेवकांत 15 मराठी भाषिक..
Belgaon election
Belgaon election

बेळगाव : बेळगाव महापालिका (Belgaum corporation Election) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. अपवाद वगळता १९८४ पासून महापालिकेवर ३७ वर्षे सत्ता कायम ठेवलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. समितीचे केवळ चार नगरसेवक निवडून आले. ४१ प्रभागांत रिंगणात उतरलेल्या काँग्रेसचे दहा नगरसेवक निवडून आले. एमआयएमनेही आपले खाते उघडले आहे.

भाजप, काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, एमआयएम व आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांनी प्रथमच महापालिका निवडणूक लढविली. पण धर्मनिरपेक्ष जनता दल व आम आदमी पार्टीला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. येथे प्रथमच पक्षीय पातळीवर महापालिका निवडणूक लढविणाऱ्या भाजपने थेट महापालिकेची सत्ता मिळविली. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी तब्बल १ लाख १७ हजार मते मिळविली होती. लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिक एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्याचा फायदा महापालिका निवडणुकीत होईल, असा दावा केला जात होता. पण प्रत्यक्षात मात्र समितीचा धुव्वा उडाला आहे.

११ ऑगस्ट रोजी अनपेक्षितपणे महापालिका निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीला स्थगिती मिळावी यासाठीही प्रयत्न झाले. विशेष म्हणजे ज्यांनी हे प्रयत्न केले त्यापैकी काहींनी निवडणूक लढविली व मोठ्या फरकाने जिंकली. यावेळी तब्बल ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कोरोना संसर्गामुळे निवडणूक प्रचारावरही निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवारांवर मर्यादा आल्या. भाजपच्या सर्व विभागांचे राज्यस्तरीय पदाधिकारी, मंत्री, स्थानिक आमदार व खासदार, जिल्ह्यातील आमदार व खासदार या सर्वांनीच प्रचारात सहभाग घेतला.

त्या तुलनेत काँग्रेसकडून प्रचार झाला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार व काही माजी मंत्री वगळता अन्य कोणीही प्रचारासाठी आले नाहीत. लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार प्रचार केला होता. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांची बेळगावातील सभा गाजली होती. पण, यावेळी समितीच्या प्रचाराला कोणीही आले नाही. प्रत्येक प्रभागातील पंच व ज्येष्ठांकडे प्रचाराची धुरा होती. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला, पण त्यांचा फारसा प्रभाव दिसला नाही.

महापालिकेतील पक्षीय बलाबल
एकूण जागा - ५८
भाजप-३५
काँग्रेस-१०
महाराष्ट्र एकीकरण समिती-४
एमआयएम-१
अपक्ष-८
---------------
महापौर निवडीकडे लक्ष
महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाकडून आता महापौर व उपमहापौरपदासाठी मराठी भाषकांना संधी दिली जाणार का? याकडे बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपमधून १५ मराठी भाषिक नगरसेवक निवडून आले आहेत. ३५ पैकी दोन नगरसेवक अनुभवी असून ३३ नवे चेहरे आहेत. त्यामुळे भाजपकडून मराठी भाषिक महापौर होणार की कानडी भाषकांना संधी देणार, याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com