नियोजन समितीत डावलल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत नाराजी 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे जिल्ह्यात नेटाने काम करताना आटपाडीला मात्र डावलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Dissatisfaction in Atpadi for not getting place in Sangli planning committee
Dissatisfaction in Atpadi for not getting place in Sangli planning committee

आटपाडी (जि. सांगली) : सांगली जिल्हा नियोजन समितीमध्ये निवडलेल्या १५ सदस्यांमध्ये आटपाडी तालुक्यातून एकाही सदस्याला संधी देण्यात आलेली नाही. जिल्हा नियोजन समितीमधून आटपाडी तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने डावल्याने नाराजीचा सूर उमटत आहेत. त्याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Dissatisfaction in Atpadi for not getting place in Sangli planning committee)

सांगली जिल्हा नियोजन समितीच्या १५ सदस्यांची निवड नुकतीच जाहीर झाली आहे. या नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा वरचष्मा राहिला आहे. आगामी निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून निवड करताना भौगोलिक आणि राजकीय समतोल मात्र साधता आलेला दिसत नाही. 

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या निवडीतून आटपाडी तालुक्याच्या पदरात पूर्ण निराशा पडली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे जिल्ह्यात नेटाने काम करताना आटपाडीला मात्र डावलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सक्रिय आहेत. त्यांचा विचारच केलेला दिसत नाही. 

राज्याच्या सत्तेत प्रमुख असलेल्या शिवसेनेच्या कोट्यामधूनही आटपाडी तालुक्याच्या झोळीत काहीच पडले नाही. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांचे खंदे समर्थक तानाजीराव पाटील यांचीही वर्णी जिल्हा नियोजन समितीमध्ये लागली नाही. सहाजिकच आटपाडीच्या शिवसेनेतही नाराजी आहेच. काँग्रेस पक्षाकडूनही तालुक्यातील कार्यकर्त्यांचा विचार झालेला नाही.

जिल्हा नियोजन समितीमधून आटपाडी तालुक्याला वगळल्याचे उघड आणि तीव्र पडसाद उमटले नसले तरी नाराजीचा सूर मात्र नक्की आहे. तोंडावर आलेल्या बाजार समिती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर याचे परिणाम दिसतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.


नियोजन समितीवर कोणाला संधी 

सांगली जिल्हा नियोजन समितीच्या १५ जणांच्या यादीला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ सदस्य असून शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी तीन जागा आल्या आहेत. या यादीत आमदार सुमन पाटील, आमदार मानसिंगराव नाईक या राष्ट्रवादीच्या आमदारांचा बरोबरच ॲड. बाबासाहेब मुळीक आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, म्हैसाळचे मनोज शिंदे-म्हैसाळकर, कासेगावचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, कवठे महांकाळच्या अनिता सगरे, मुचंडीचे रमेश पाटील, पुणदीचे रवींद्र पाटील यांचा राष्ट्रवादीकडून समावेश झाला आहे. 

शिवसेनेने इस्लामपूरचे नगरसेवक व जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, सांगलीचे संघटक दिगंबर जाधव, कवठे महांकाळचे माजी आमदार अजितराव घोरपडे यांना, तर काँग्रेसकडून बेणापूरचे सुहास शिंदे, सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बुधगावचे अनिल डुबल यांना संधी दिली आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com