आमदार संजय शिंदे यांच्याविरोधात कलेक्टर आणि एसपींकडे गंभीर तक्रार - Serious complaint against MLA Sanjay Shinde to Collector and SP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

आमदार संजय शिंदे यांच्याविरोधात कलेक्टर आणि एसपींकडे गंभीर तक्रार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव (ता. माढा) या साखर कारखान्याने तब्बल 22 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांच्या नावे परस्पर काढल्याचे उघड झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्हाला न्याय द्यावा; अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी आर्त हाकही त्यांनी निवेदनात दिली आहे. (Serious complaint against MLA Sanjay Shinde to Collector and SP)

आमदार संजय शिंदे हे विठ्ठल कॉर्पोरेशन या साखर कारखान्याचे संस्थापक आहेत. त्यांनी आपल्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांना 2013 मध्ये खत देतो; म्हणून त्यांच्याकडून कागदपत्रे जमा केली आहेत. मात्र, शेतकऱ्यांना खत न देता त्या कागदपत्रांचा गैरवापर करत पुण्यातील कोथरूड येथील पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे तब्बल 22 कोटी 11 लाख रुपयांची रक्कम उचलल्याचे समोर आले आहेत. या शेतकऱ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या कारखान्याचे अध्यक्ष व कारखान्यावर कारवाई करावी. आम्हाला न्याय द्यावा; अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी व्यथा शेतकरी रणजीत भोगल अशोक भोगल, प्रदीप ढवळे या शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे कर्ज असलेल्या तक्रारदार शेतकऱ्यांपैकी अशोक भोगल हे पोलिस असून त्यांच्याही नावावर विठ्ठल कार्पोरेशन कारखान्याने कर्ज उचलेले आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षण गमावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार

याबाबत माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील शेतकरी रणजीत भोगल, अशोक भोगल व प्रदीप ढवळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना मे महिन्यात पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या कोथरूड शाखेच्या कर्ज घेतलेल्या नोटिसा आल्या आहेत. या नोटिशा हातात पडताच शेतकरी हबकून गेले आहेत. 

दरम्यान, या शेतकऱ्यांना विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव यांनी 2013 मध्ये खत घेण्यासाठी म्हणून शेतकऱ्याच्या नावाने दोन लाख रुपयांच्या आसपास रक्कम उचलल्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे. या शेतकऱ्यांनी कोणत्याच प्रकारे बॅंकेकडून कर्ज घेतले नसताना आलेली नोटीस पाहून शेतकरी चक्रावून गेले आहेत. याबाबत अधिक माहिती व चौकशी केली असता आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव येथील कारखाने 2013 मध्ये हे कर्ज उचलले असून शेतकऱ्यांच्या परस्पर या या कर्जाचे 2017 मध्ये नवे-जुने केले आहे. दरम्यान, यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांना 29 मे 2019 रोजी नोटीस आली आहे. शेतकऱ्यांच्या नावे उचलेली एकूण रक्कम 22 कोटी 11 लाख रुपये असून शेतकऱ्यांनी आपापल्या नावे असलेले कर्जे भरावे; अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा बॅंकेने दिला आहे.

करमाळ्याचे लोकप्रतिनिधी असलेले संजय शिंदे यांनी नुसत्या विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढून जी फसवणूक केली आहे, त्याचे उत्तर द्यावे. त्यांनी त्वरीत आमच्या नावावर उचलेले कर्ज भरुन आम्हाला कायदेशीर कचाट्यातून वाचवावे, अन्यथा आमदार संजय शिंदे यांच्या घरापुढे आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असा इशारा या तक्रारदार शेतकऱ्यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत दिला आहे. या वेळी उजनी धरण पाणी बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे हेही उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख