प्रशांत परिचारकांच्या हस्ते मराठा आंदोलनाचा नारळ फोडून चूक केली   - Sambhaji Brigade's objection to the presence of Prashant Paricharak in the Maratha movement | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

प्रशांत परिचारकांच्या हस्ते मराठा आंदोलनाचा नारळ फोडून चूक केली  

भारत नागणे 
सोमवार, 28 जून 2021

अशा आमदारांना बोलावता. याचा कुठे तरी मराठा समाजातील नेत्यांनी विचार करावा.

पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येत्या 4 जुलै रोजी सोलापुरात मराठा संघर्ष समितीच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी आज (ता. २८ जून) माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठात समाज बांधवांची नियोजनाची बैठक पार पडली.

बैठकीपूर्वी नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत संत नामदेव पायरी येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नारळ फोडून आंदोलनाची हाक दिली. हीच गोष्ट संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे यांना चांगलीच खटकली. त्यांनी भर बैठकीत परिचारकांच्या उपस्थितीविषयी नाराजी व्यक्त करत आमदार  परिचारकांवर टीका केली. (Sambhaji Brigade's objection to the presence of Prashant Paricharak in the Maratha movement)

भाजप सरकारच्या काळात आमदार प्रशांत परिचारकांनी मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडून अन्याय केला आहे. नामदेव भुईटेसारख्या तरुणाचा बळीदेखील गेला आहे. अशा अनेक तरुणांना त्यांच्या राजकारणाची झळ पोचली आहे. अशा लोकांच्या हस्ते नारळ फोडून चूक केली आहे.  

पंढरपूर तालुक्यात मराठा समाजाचे अनेक नेते आहेत. त्यांच्या हस्ते आंदोलनाचा नारळ फोडला असता तरी आम्ही त्यावर आक्षेप घेतला नसता. पण, ज्यांनी मराठा समाजातील तरुणांना सतत टार्गेट करुन त्रास देण्याचा प्रयत्न केला, अशा आमदारांना बोलावता. याचा कुठे तरी मराठा समाजातील नेत्यांनी विचार करावा. यात कुठेही राजकारण म्हणून विरोध नाही, तर मराठा समाजावर होत असलेला अन्याय सहन होत नाही; म्हणून आमचा त्यांना विरोध असल्याचेही किरण घाडगे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : भरणेंच्या फोटोवरून शिक्षक आणि माजी मंत्र्याच्या मुलामध्ये वाद

त्यांच्या या परिचारक विरोधी भूमिकेमुळे आंदोलनापूर्वीच पंढरपूर तालुक्यात मराठा समाजात दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठा विरुध्द ब्राम्हण असा नवा वाद पेटण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत.

दरम्यान, याबाबत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी मात्र परिचारकांची बाजू घेतली असून मराठा समाजातील तरुणांनी जातीय तेढ किंवा वाद निर्माण होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करुन नये, असे आवाहन केले आहे. मराठा समाज आरक्षण आंदोलनाला सर्वच समाजातील लोकांनी पाठिंबा दिला आहे. आमदार प्रशांत परिचारकांनीही वेळोवेळी मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आजही मराठा आंदोलनात ते सर्व मराठा समाजबांधवांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहेत. याला कोणी वेगळे वळण देवू नये, असेही आमदार आवताडे यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख