आमदार राऊतांविरोधात दिलीप सोपलांची महाआघाडी; राजकीय घडामोडींना वेग

आम्ही एकत्र घेऊन लढलो तर निकाल वेगळा असेल.
Dilip Sopal will form a maha Agadi against MLA Rajendra Raut for Barshi Municipal Council elections
Dilip Sopal will form a maha Agadi against MLA Rajendra Raut for Barshi Municipal Council elections

बार्शी (जि. सोलापूर)  ः बार्शी नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सोशल मीडियाच्या माध्यमातून झडताना दिसत आहेत. विविध विकास कामांचे श्रेय थेट मुंबईत मंत्रालयात बसून घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी-विरोधक यांच्यात प्रथमच झाल्याचे बार्शीकर जनतेला पहायला मिळाल्याने चर्चेचा विषय बनला आहे . भारतीय जनता पक्ष पुरस्कृत विद्यमान अपक्ष आमदार विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून त्यातील काही पक्ष वेगळी चूल मांडणार का? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. (Dilip Sopal will form a maha Agadi against MLA Rajendra Raut for Barshi Municipal Council elections)
   
बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे विधानसभा, नगर परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा महत्वाच्या संस्थांची सत्ता असल्याने त्यांनी विकासकामांचा धडाका सुरु केला आहे. तसेच, जनताच ठरवेल मतदान कोणाला करायचे, सत्ता कोणाच्या ताब्यात द्यायची, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी जाहीर करुन विरोधकांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात व्यूहरचना 

भारतीय जनता पक्षाचे सहयोगी असलेले अपक्ष आमदार राऊत यांच्या विरोधात महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेस हे पक्ष राऊतांच्या कामांवर आक्षेप घेत सोशल मीडियावर आरोप करून शहर-तालुक्यातील जनतेसमोर जाताना दिसत आहेत. राजकारणाचा प्रगल्भ अनुभव असलेले माजी मंत्री दिलीप सोपल हे शिवसेनेच्या सत्तेच्या माध्यमातून तसेच त्यांचा शब्द अंतिम मानला जाऊन महाविकास आघाडी जोमाने नगरपरिषद निवडणूक लढण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, गृहनिर्माण मंडळाचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना स्थानिक पातळीवर एकत्र आणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात व्यूहरचना आखत निवडणूक लढवणार अशी चिन्हे दिसत आहेत. त्यांच्यामध्ये झालेल्या एकत्र बैठका त्याचेच द्योतक आहे.

सोपलांचा थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद  

महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री दिलीप सोपल यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी साधलेला संवाद, शासकीय औद्योगिक वसाहत, बार्शी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वैराग ग्रामीण रुग्णालय, वैराग पाणीप्रश्न, उपसा सिंचन योजनेसाठी निधी यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असून श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असा दावा केला आहे. बार्शीच्या विकासासाठी भाऊसाहेब आंधळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या आहेत. या घटनांची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.
  
काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची

काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवनदत्त आरगडे यांनी महाविकास आघाडी सत्तेत असली तरी काँग्रेस आगामी नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले आहे. ते ऐनवेळी कोणती भूमिका घेणार, पक्षांचा आदेश मान्य करणार का डावलणार? अशी चर्चा शहरासह तालुक्यात आहे. राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार आहेत. आम्हीही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथील स्थानिक प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे. सोपल आणि मिरगणे यांच्याशी अजितदादांचे असलेले संबंध सर्वश्रूत आहेत.    
नगरसेवकांमधून नगराध्यक्षपद मिळणार असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. माजी मंत्री सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत मिरगणे आणि आंधळकर यांना नाकारता येणार नाही. आम्ही एकत्र घेऊन लढलो तर निकाल वेगळा असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे यांनी केला आहे .

विरोधकांनी नगरसेवक होऊन दाखवावे

माजी मंत्री सोपलच माझे विरोधक आहेत, असे आमदार राऊतांनी जाहीरपणे सांगितले आहे. नगरपरिषदेचे घोडा मैदान जवळच आहे. लढून दाखवा, विरोधकांनी नगरसेवक होऊन दाखवावे, मी निवडणुकीसाठी तयारच आहे, असा इशारा आमदार राऊत यांनी दिला आहे.
   
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीपूर्वीच शहर अन् तालुक्यात सोशल मिडियावर तसेच विविध कार्यक्रमात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com