BJP's Sadhana Bhosale's name in the lead for Pandharpur by-election
BJP's Sadhana Bhosale's name in the lead for Pandharpur by-election

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून साधना भोसलेंचे नाव आघाडीवर 

भोसलेंच्या उमेदवारीसाठी आमदार प्रशांत परिचारक देखील आग्रही असल्याची माहिती आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कारभाराची लिटमस चाचणी होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची, तर विरोधी भाजपचे अस्तित्व सिद्ध करणारी आहे. त्यामुळे दोन मे रोजी लागणाऱ्या पंढरपूरच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. 

दरम्यान, सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाले तर विरोधी भाजपकडूनही महिला उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक गटाच्या कट्टर समर्थक, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे नाव आघाडीवर आहे.

शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांनीही महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली, तर अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भालके, भोसले आणि गोडसे अशी तिरंगी लढत होण्याची शक्‍यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे. 

राष्ट्रवादीला प्रयत्नांची पराकष्टा करावी लागणार 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी समजली जात असली तरी ती तितकी सोपी राहिली नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक आणि संत दामाजी कारखान्याचे समाधान आवताडे यांचीही भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकष्टा करावी लागणार आहे. 

भाजप लाटेतही भालकेंनी राखला होता गड 

आमदार भारत भालके यांचे या मतदारसंघावर गेल्या 11 वर्षांपासून वर्चस्व होते. त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचाही त्यांनी पराभव करून आपली ताकद दाखवून दिली होती. राज्यात 2019 मध्ये भाजपची लाट असतानाही ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकर परिचारक यांचाही त्यांनी धक्कादायक पराभव करत विजयाची हॅटट्रीक साधली होती. 

अनुभवी नेतृत्वाची पोकळी 

निवडणुकीनंतर एक वर्षामध्येच आमदार भारत भालके व माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे निधन झाले. त्यामुळे मतदारसंघात ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. भालके यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगिरथ, तर सुधाकर परिचारकांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारकांकडे त्यांच्या गटाचे नेतृत्व आले आहे. 

जयश्री भालकेंच्या नावाची चर्चा 

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये आमदार भारत भालके यांचे पुत्र भगिरथ की त्यांच्या पत्नी जयश्री या दोन नावावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी जयश्री भालकेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. 

शैला गोडसेंचा भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न 

जयश्री भालकेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून नगराध्यक्षा साधना भोसले किंवा त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्‍यता आहे. भोसलेंच्या उमेदवारीसाठी आमदार प्रशांत परिचारक देखील आग्रही असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनीही भाजपशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपने उमेदवारी दिली, तर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची तयारी देखील दाखवली आहे. तरीही परिचारक समर्थक नगराध्यक्ष साधना भोसले यांचेच नाव सध्या अधिक चर्चेत आहे. नगराध्यक्षपद मिळण्याच्या आधीपासूनच त्या राजकीय व सामाजिक कार्यात अग्रभागी आहेत. त्यांचे पती नागेश भोसले यांचाही मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. 

आवताडे गट लागला कामाला

मागच्या वेळी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला गोडसे यांनीही निवडणुकीची तयारी म्हणून मतदारसंघातील दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे मंगळवेढा तालुक्‍यातील शिरनांदगी तलावात पाणी आले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयीही मतदारांमध्ये सहानुभूती आहे. दरम्यान संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र  निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे पंढरपूरची ही पोटनिवडणूक तिरंगी की चौरंगी होणार? याकडेच लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com