मंगळवेढ्यास सध्या राजकीय कोरोना झालाय, त्यास रेमडेसिव्हर देण्याची गरज  

आगामी काळात आवताडे आणि भालके यांची युती होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Avtade and Bhalke groups will come together in Mangalvedha
Avtade and Bhalke groups will come together in Mangalvedha

मंगळवेढा (जि. सोलापूर) :  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांनी निवडणूक लढवली होती. भाजप सोडून अन्य पक्षांशी युती करून आगामी निवडणुका लढण्याची मागणी बबनराव आवताडे समर्थकांकडून होत आहे. त्यामुळे आगामी काळात आवताडे आणि भालके यांची युती होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. (Avtade and Bhalke groups will come together in Mangalvedha)  

दरम्यान, बबनराव आवताडे गटाने आंधळगाव येथे घेतलेल्या बैठकीत ‘मंगळवेढा तालुक्यास सध्या राजकीय कोरोना झाला असून बबनराव आवताडे यांच्या रूपाने रेमडेसिव्हर देण्याची गरज आहे,’ असे समर्थकांनी बोलून दाखवले. त्यामुळे हे रेमडेसिव्हर नेमके कुणावर उपचार करणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद पणास लावून समाधान आवताडे यांना आमदार केले. त्यामुळे भाजप आगामी निवडणुका ह्या आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली लढणार हे स्पष्ट आहे. पण, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्या गटाने आंधळगाव येथे नुकतीच एक बैठक घेतली. त्या बैठकीत भाजप सोडून अन्य पक्षांशी युती करून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हे निसटत्या मताने पराभूत झाले, त्यामुळे त्यांनी आगामी काळात बबनराव आवताडे यांच्याशी जुळवून घ्यावे, असे काही समर्थकांना वाटते. तसे काहीजण अप्रत्यक्ष बोलूनही दाखवत आहेत. 

मंगळवेढा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके यांनी बबनराव आवताडे यांचा सत्कार करून या युतीचे पहिले पाऊल टाकले आहे का? अशी चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने भालके गट कदाचित बबनराव आवताडे यांना जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या डिसेंबरमध्ये मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, तर फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व दामाजी कारखान्याची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना निसटत्या मताने पराभूत होऊन सत्ता जाऊ नये, अशी भूमिका भालके समर्थकांची आहे.

मंगळवेढा तालुक्यात काँग्रेस आणि शिवसेनेचे अस्तित्व अल्प आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक अन्य राजकीय नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपतच खरी लढत होणार आहे. अशा वेळी बबनराव आवताडे यांचा गट निर्णायक भूमिका बजावू शकतो. त्यामुळे या गटाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. 

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमध्येही अंतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. जनता दरबारच्या पत्रिकेत मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचे फोटो न टाकल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडीतही भगीरथ भालके यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याने भालके गटानेदेखील भोसे येथे बैठक घेत भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली निवडी करण्याच्या सूचनेवर एकमत केले. त्यामुळे उर्वरित काळातील राजकीय घडामोडी सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपल्या आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि दामाजी कारखाना हे तालुक्याच्या राजकारणातील नवे नेतृत्व घडविण्यास कारणीभूत ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com