`मातोश्री`ने आमच्यासाठी दरवाजे बंद केलेत : फडणवीस यांची खंत - Door of Matoshree Closed for us says Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

`मातोश्री`ने आमच्यासाठी दरवाजे बंद केलेत : फडणवीस यांची खंत

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विष्णुपुरीतील कोरोना केंद्राला भेट देऊन नंतर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला.

नवीन नांदेड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची नुकतीच त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याबाबत श्री. फडणवीस यांनी खासदार राऊत यांच्या टिकेला प्रतिउत्तर दिले असून आम्ही `मातोश्री`वर जाणे बंद केले नाही तर मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले असल्याचे सांगितले.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी बुधवारी (ता. दोन) दुपारी नांदेडला आल्यानंतर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार राजेश पवार, आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, शहराध्यक्ष प्रविण साले, ॲड. दिलीप ठाकूर आदी उपस्थित होते. श्री. फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर आॅक्सीजन प्लॅन्टचीही पाहणी केली.

ही बातमी वाचा : तेव्हा आम्ही राज्य सरकारला जाब विचारू

त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या आणि मृत्यूच्या नोंदीत मोठी तफावत असल्याचे सांगून त्याकडे महाविकास आघाडीचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. मृत्यू आणि नोंदी बरोबर झाल्या असत्या तर उपाययोजना करण्याची तयारी व्यवस्थित करता आली असती, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गडकरी यांच्यावर स्तुती करणारा लेख लिहिला होता. त्यावर श्री. फडणवीस म्हणाले की, नुसती गडकरींच्या कामांची स्तुती करु नका तर तुम्हीही तसे काम करुन दाखवा. म्हणजे लोक तुमचीही स्तुती करतील, असा टोला त्यांनी लगावला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख