म्हणून शरद पवार हे नाना पटोलेंवर नेहमीच टोमणे मारत असतात!

नाना पटोलेंचे आणि शरद पवारांचे फारसे जमले नाही...
Sharad Pawar-Nana Patole
Sharad Pawar-Nana Patole

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मनात काही नेत्यांबद्दल अढी बसली की ती लवकर निघत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असोत की काॅंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल ते टोमणे मारत बोलतात. त्यातही नानांबद्दल बोलताना त्यांचा स्वर कडवट होतो. (Sharad Pawar taunts Nana Patole)

काॅंग्रेसच्या या आधीच्या प्रदेशाध्यक्षांबाबत पवारांनी उपरोधिक टीका केली असेल. पण नानांवरील टीका ही थेट असते. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दुसरे नेते प्रफुल्ल पटेल आणि नाना हे एकाच भंडारा-गोंदिया भागातील आहेत. पटेल आणि नानांचे अपवाद वगळता फारसे पटले नाही. पटेल हे शरद पवारांच्या अतिशय जवळचे असल्याने नानांबद्दल पवारांकडे तक्रारी झाल्याच नसतील, असे म्हणता येत नाही.

नाना पटोले हे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अस्वस्थ झाले. पटोले एवढ्यावरच थांबले नाहीतर पवार यांचे पूर्ण वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मेळाव्यात मला बारामतीत लक्ष घालावे लागेल, अशी पवारांसाठीच आव्हानात्मक भाषा वापरली. याच वेळी बोलताना महाविकास आघाडी सरकारच माझ्यावर पाळत ठेवते आहे, असाही आरोप केला.

या साऱ्या आरोपांबद्दल शरद पवार यांना बारामतीत पत्रकारांनी विचारले असता पटोले हे लहान आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, असे थेट त्यांनी सांगितले. पवार हे पटोलेंबद्दल पहिल्यांदाच असे बोललेले नाहीत. पटोले हे भाजपचे खासदार असताना त्यांनी पक्षाशी फारकत घेतली आणि मोदी सरकारविरोधात टीका सुरू केली होती. पुण्यातील पत्रकारांनी पटोलेंच्या आरोपांवर शरद पवारांना विचारले असता त्यांनी जरा चांगल्या माणसाबद्दल प्रश्न विचारा, असे सांगत पटोले यांची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न केला होता.

पटोले हे पवारांच्या निशाण्यावर का, याचा शोध घेतला असता तो 2009 पर्यंत मागे जातो. शरद पवार हे केंद्रात कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती. तेव्हा पटोले हे काॅंग्रेसमध्ये होते. या कर्जमाफीवर पटोलेंनी टीका करत ही केवळ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच असल्याची ओरड केली होती. या कर्जमाफीबद्दल देशभर कौतुक होत असताना पटोलेंची ही भूमिका राष्ट्रवादीला पसंत पडली नाही. पटोलेंना काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मंत्रीमंडळात कधीच स्थान मिळाले नाही. त्यांचे नाव अखेरच्या क्षणी कापले जायचे. आपले नाव कापायचे काम प्रफुल्ल पटेल करतात, असा नानांना संशय होता. त्यामुळे नानांचे आणि राष्ट्रवादीचे कधी जुळले नाही. साहजिकच पवारांनाही मग पटोलेंबद्दल विचारले की ते पण चिडतात. 

काॅंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत नाना पटोलेंना त्यांनी नेले नाही. पवारांनीही तुम्ही खरेच स्वबळावर लढणार आहात का, अशी विचारणा या तिघांनी केली. याचा अर्थ नाना जी स्वबळाची भाषा वारंवार बोलत आहेत, ती राष्ट्रवादीला पसंत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळेच पटोले हे लहान आहेत, असे पवार थेट सांगत असतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com