वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून राष्ट्रवादीच्या संतोष वारेंनी जपला कोरोना रुग्णसेवेचा वसा!

वारे हे रुग्णांशी संवाद साधत रुग्णांच्या मनातील भीती घालविण्याचा प्रयत्न करत असतात.
NCP's Karmala taluka president Santosh Ware started Kovid Center
NCP's Karmala taluka president Santosh Ware started Kovid Center

करमाळा (जि. सोलापूर) : आई-वडील, लहान भाऊ आणि स्वतःचाही कोरोनाशी लढा सुरू असतो... त्याच वेळी ते ठरवतात की समाजातील गोरगरिब कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करायचं....वडील नगरमधील रुग्णालयात कोरोनामुळे शेवटच्या घटका मोजत होते....पण त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतः कोरोनातून बरे झाल्यानंतर स्वखर्चाने पोथरे (ता. करमाळा) येथे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले....मात्र, कोरोनाशी झुंजणाऱ्या वडिलांचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला...समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले... त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून ते कोविड सेंटरमध्ये हजेरी लावून रुग्णसेवा सुरू करतात. (NCP's Karmala taluka president Santosh Ware started Kovid Center)

ही कहाणी कोणा आमदाराची नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष आणि करमाळा बाजार समितीचे संचालक संतोष वारे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या तरुणाची आहे. संतोष वारे यांना स्वतः बरोबरच आई-वडिल आणि लहान भावालाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनातून बरे झाल्याने त्यांनी कोविड सेंटर सुरू केले. त्याचे उद॒घाटन महाराष्ट्रात आदर्श कोविड सेंटर चालविणारे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे वारे यांचे वडिल नगरमधील रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होते. दुर्दैवाने त्यांचा लढा अपयशी ठरला आणि त्यांचा मृत्यू झाला. रुग्णसेवेचा वसा हाती घेतलेल्या संतोष वारे यांनी वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून अंत्यसंस्कारानंतर रुग्णसेवेला वाहून घेतले. सुखात सर्वजण सहभागी होतात. ज्या कोरोना काळात कुटुंबातील माणसं आपल्याच माणसाजवळ जाण्यास घाबरतात, अशा परिस्थितीत वडिलांच्या निधनाचे दु :ख बाजूला ठेवून संतोष वारे हे समाजातील कोरोना रुग्णांसाठी झटत आहेत. करमाळा तालुक्यातील अनेक कोरोना रूग्णांना पुणे, नगर, अकलूज, बार्शी, येथे बेड मिळवून देण्याचे कामही वारे यांनी केले आहे. 

संतोष वारे हे माजी मंत्री (कै.) दिगंबरराव बागल यांचा आदर्श घेऊन समाजकार्यात आले. बागल परिवारातूनच त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. जातेगावचे सरपंच ते बाजार समितीच्या संचालकपदापर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांच्या पत्नी राणी वारे यांनीही जातेगावचे सरपंचपद भूषवले. सध्या त्या सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्य आहेत.

विधानसभा निवडणुकीवेळी बागल कुटुंबीय शिवसेनेत गेले. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर संतोष वारे यांची श्रद्धा असल्याने पक्षाने त्यांना पुढे तालुकाध्यक्ष केले. सामाजिक कामासाठी संतोष वारे हे कायम पुढे असतात. गेल्यावर्षी त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात गरीबांना किराणा मालाचे कीट वाटप केले. पांडे जिल्हा परिषद गटात पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले.

या वर्षी कोवीड रूग्णांना मदत करण्यासाठी वारे यांनी पोथरे येथील आनंदी लाॅन्स मध्ये शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदीर नावाने शंभर बेडचे कोव्हीड सेंटर सुरू केले. आतापर्यंत या केंद्रातून 132 जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 74 जणांवर उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांना चहा नाष्टा व उत्तम जेवण दिले जात आहे. या शिवाय वेळोवेळी तपासणी करून स्वतः वारे हे रुग्णांशी संवाद साधत रुग्णांच्या मनातील भीती घालविण्याचा प्रयत्न करत असतात. 

नीलेश लंकेंसोबतच्या त्या व्हिडिओमध्ये संतोष वारे 

राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी कोविड सेंटर सुरू केले. या कोवीड सेंटरच्या उद्‌घाटनाच्या वेळी नीलेश लंके यांचे पाय धुऊन स्वागत करण्याचा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला होता. या कोवीड सेंटरच्या उद्‌घाटनावेळी लंके यांचे पाय धुणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून संतोष वारे हे स्वतः आहेत. 

करमाळा तालुक्यात आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गटातटामुळे वाढू शकला नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना करमाळ्यात पक्ष रुजवणे आणि वाढवणे, यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही चांगले पाठबळ मिळत आहे.
-संतोष वारे, राष्ट्रवादी काँग्रेस, तालुकाध्यक्ष करमाळा, जि. सोलापूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com