विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरीत दाखल

ते मंगळवारी (ता. २० जुलै) पहाटे२.१५ वाजता सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करतील.
Chief Minister Uddhav Thackeray arrives in Pandharpur for Mahapuja of Vitthal
Chief Minister Uddhav Thackeray arrives in Pandharpur for Mahapuja of Vitthal

पंढरपूर : विठ्ठलाच्या महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक सुमारे साडेआठच्या सुमारास पंढरपुरात दाखल झाले. त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकरही आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे हे स्वतः मुंबईहून गाडी चालवत महापुजेसाठी आले आहेत. गेल्यावर्षीही ते गाडी चालवत आले होते. प्रथेप्रमाणे ते मंगळवारी (ता. २० जुलै) पहाटे २.१५ वाजता सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करतील. (Chief Minister Uddhav Thackeray arrives in Pandharpur for Mahapuja of Vitthal)

पाऊस आणि खराब हवामान यामुळे विमानाने प्रवास करणे अशक्य असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकदशीनिमित्त महामार्गानेच पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री ठाकरे ह्यांनी मुंबई ते पंढरपूर स्वतः ड्रायव्हिंग केली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, मुंबईहून दुपारी निघालेला मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपुरात पोहचला. आज रात्री ते पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करणार असून उद्या पहाटे परंपरेप्रमाणे विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील. या वर्षी मुख्यमंत्र्यांसमवेत वारकऱ्यांमधून पूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते आणि इंदूबाई केशव कोलते यांना मिळाला आहे. केशव कोलते गेली सुमारे 20 वर्षांपासून मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.

वाद मिटला; मानाच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ

दरम्यान, सोमवारी सायंकाळी 6 पर्यंत मानाचे 10 संतांचे पालखी सोहळे वाखरी पालखी तळावर दाखल झाले होते. परंतु, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 'आम्ही ज्या वारकऱ्यांसोबत आलो आहोत, त्या सर्व वारकऱ्यांसोबत आम्हाला पंढरपुरात प्रवेश द्यावा,' या मागणीसाठी रात्री 8.45 पर्यंत वाखरी पालखीतळावरच कोणत्याही निर्णयाविना होता.

अखेर रात्री नऊ वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे आणि प्रांताधिकारी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मध्यस्थीने वाखरी तळावरच पालखीसोबत किती वारकरी जाणार याबाबतचा वाद मिटला. सर्व संतांच्या पालख्या इस्बावीपर्यंत शिवशाही बसने जाणार आणि इस्बावीपासून प्रत्येकी 30 वारकऱ्यांना पायी चालण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार त्यानुसार रात्री 9 वाजता सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या.  सर्वात शेवटी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी तळावरून जाणार आहे. सुमारे 300 वारकरी हरिनामाचा गजर करीत इसबावी ते पंढरपूर असा पायी पालखी सोहळा पंढरपूरला पोचणार आहे.

याबाबत देहू संस्थानचे माणिकराव महाराज मोरे म्हणाले की, आम्ही सरकारचे नियम मान्य करुन बसने आलो. पादुका दोन माणसे घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यासोबत गरुडटक्के, चोपदार, पताका, विना असावा लागतो. त्याशिवाय प्रवेश करता येत नाही. आम्ही वारकरी अगदी मोजक्या वारकऱ्यांसोबत आलो आहोत. प्रत्येक पालखीसोबत 40 वारकरी आहोत, त्यांना पायी जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. पण प्रशासनाने आम्हाला तीस वारकऱ्यांना पालखीसोबत चालण्याची मुभा दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com